
विधानसभा निवडणुकीत महायुतीची लाट नव्हे तर त्सुनामीच आली. तर महाविकास आघाडीला दारूण पराभवाचा धक्का बसला. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएम मशिनवर आक्षेप घेतला जात आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील एका गावाने थेट बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मारकडवाडी गावातील नागरिकांनी तहसिलदारांना निवेदन दिलं असून मतदानाच्या प्रक्रियेसाठी शासकीय कर्मचारी द्यावेत असं पत्र दिलंय.
शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांना मारकडवाडी गावात याआधीच्या निवडणुकांमध्ये मोठं मताधिक्क्य मिळालं होतं. पण विधानसभा निवडणुकीत भाजपच्या राम सातपुते यांना जास्त मते मिळाली. यामुळे जानकर गटाकडून स्वखर्चाने गावात बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं यासाठी थेट तहसिलदारांना पत्र देण्यात आलंय.
माळशिरस विधानसभेतील मारकडवाडी या गावातून आमदार राम सातपुते यांना लीड मिळाला आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत शंका व्यक्त केली असून पारंपारिक हे गाव उत्तम जानकर यांच्या विचाराशी असून या गावातून राम सातपुते यांना लीड कस काय मिळू शकतो. असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित करत या ठिकाणी पुन्हा निवडणूक घ्यावी निवडणुकीची चाचणी घ्यावी असे पत्र तहसीलदार यांना दिले त्यामुळे या गावाची संपूर्ण चर्चा होत आहे.
विधानसभेला उत्तम जानकर यांना मारकडवाडीतून ८४३ मते मिळाली तर भाजपच्या राम सातपुते यांना १००३ मते मिळाली. याआधीच्या तिन्ही विधानसभा निवडणुका आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत गावातील ८० टक्के मतदान हे जानकर गटाला झाल्याचा दावा जानकर समर्थकांनी केलाय. यासंदर्भातील पुरावेसुद्धा त्यांनी सोबत जोडले आहेत. त्यामुळे निवडणुकीत घोटाळा झाला असून ३ डिसेंबरला बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचा ठराव गावाने केलाय. या प्रक्रियेचा खर्च करण्याची तयारीसुद्धा गावकऱ्यांनी दर्शवली आहे.
विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकर यांना मोठं मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा होता. मोहित पाटील आणि उत्तम जानकर हे एकत्र आल्यानं शरद पवार गटाला १ लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. पण उत्तम जानकर हे फक्त १३ हजारांनीच विजयी झाले.