
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अजून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. तसेच नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणाही झालेली नाही.
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील आपला दावा सोडल्याचं स्पष्ट केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांची CM म्हणून घोषणा करण्यात आलेली नाही. याचवरुन आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धडाडती तोफ सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फटकारलं आहे.
सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत महायुतीतील भाजप,शिंदेसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. त्या म्हणाल्या,विजयाची खात्री नसलेल्या शिंदे गटाच्या वाचाळ प्रवक्त्यानं म्हटलं होतं की, जर 48 तासांत सरकार स्थापन नाही झालं, तर 26 नोव्हेंबरला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, मात्र, त्या शिंदे गटाचा सत्तेतील दावा संपला आहे.पण सर्वात मोठा पक्ष ठरुनही भाजपचा मुख्यमंत्री अद्याप ठरत नसल्यावर अंधारेंनी बोट ठेवलं आहे.
एकीकडे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता जर 5 डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी होणार असेल तर 5 तारखेपर्यंत हे राज्य कोणाच्या भरवशावर चालणार आहे, असा तिखट सवाल सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी सुषमा अंधारे यांनी लाडकी बहीण योजनेवरून भाजपला सुनावलं आहे. त्या म्हणाल्या,लाडक्या बहिणींना सत्तेत वाटा मिळणार आहे की नाही? लाडक्या बहिणी १५०० रूपयांमध्ये आणि अख्खी तिजोरी लाडक्या भावाच्या हातात असं किती दिवस चालणार आहे? भारतीय जनता पार्टीमध्ये एकही महिला मुख्यमंत्रिपदासाठी योग्य नाही का? असे खडेबोल अंधारेंनी यावेळी सुनावले आहेत.
दिल्लीतील बैठकीनंतर महायुतीमध्ये भाजपकडेच मुख्यमंत्रिपद असणार हे स्पष्ट झाले आहे. या बैठकीच्या आधीचा फोटोमध्ये एकनाथ शिंदे यांची बाॅडी लँग्वेजमध्ये ते नाराज असल्याचे स्पष्ट दिसत होते. मंत्रिपदांबाबत महाराष्ट्रात पुढील चर्चा होईल, असे सांगण्यात येत होते.
मात्र, महाराष्ट्रात आल्यानंतर एकनाथ शिंदे हे थेट सातारा जिल्ह्यातील आपल्या दरेगावात गेले आहेत.याचवेळी शिंदेंचे विश्वासू नेते संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याने गावी गेले असल्याचे सांगितले.ते म्हणाले, राजकीय पेच प्रसंग येतो, तेव्हा मुख्यमंत्रीसाहेबांना विचार करण्यासाठी वेळ हवा असतो. त्यावेळी ते आपल्या गावी जातात. त्यांच्या गावात फोन लागत नाही. तेथे रेंज नाही. उद्या संध्याकाळपर्यंत ते आपला निर्णय घेतील, असंही शिरसाट यांनी म्हटलं.