विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या घवघवीत यशानंतर अजून महाराष्ट्रात सत्ता स्थापन झालेलं नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी 23 नोव्हेंबरला लागल्यापासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण यावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस कोणाच्या गळात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार हे गुलदस्त्यात आहे. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथविधी 5 डिसेंबरला आझाद मैदानावर होणार याविषयी अधिकृत घोषणा केली आहे. बावनकुळेंनी घोषणा केली मात्र अद्यापही मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यात ठेवले आहे. मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी हिंट दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर मुख्यमंत्री भाजपचा असणार हे जवळपास निश्चित झालं होतं. 28 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीदायक माहिती सूत्रांनी दिलीय. दिल्लीतील बैठकीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्याच दिवशी तब्येत ठीक नसल्याचे सांगत साताऱ्याला गेले. मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत आहे.
सुधीर मुनगंटीवारांनी काय संकेत दिले?
सुधीर मुनगंटीवार यांनी संकेत दिली. गटनेता म्हणून ज्याची निवड होते तोच मुख्यमंत्री होतो का? या प्रश्नावर उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, असा नियम असतो. संसदीय समितीचा जो नेता होतो तोच मुख्यमंत्री होतो.
5 डिसेंबरला कोण कोण शपथ घेणार?
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कोण शपथ घेणार? अद्याप कोणालाच माहीत नाही. त्यावर सध्या भाष्य करणे अयोग्य आहे. मात्र त्यासंदर्भातील यादी तिन्ही पक्षाच्या नेत्यांची यादी मंजूर होऊन समोर येईल तेव्हा भाष्य करणे योग्य ठरेल. राज्याला वन ट्रिलियन डॉलर इकोनॉमीपर्यंत जायचे आहे. काही नवे आणि काही जुने सहकारी सोबत असतील. कोण मंत्री होते याहीपेक्षा राज्य पुढे नेणे हे महत्त्वाचे आहे.
भाजपचा गटनेता म्हणून कुणाची निवड होईल?
भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे व महायुतीचे मुख्यमंत्री होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. तर, दिल्लीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांचेच नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. . दरम्यान, महायुतीतील सर्वच मित्र पक्षांच्या गटनेत्यांची निवड झाल्यानंतर आता भाजपचा गटनेता कधी निवडला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे, भाजपचा गटनेता म्हणून कुणाची निवड होईल याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. भाजपच्या आमदारांमध्ये देवेंद्र फडणवीसांचे नाव गटनेतेपदी निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील अशी चर्चा आहे.
