दापोलीत 25 नोव्हेंबरपासून किमान तापमानात घट होत असून दि. 30 रोजी ‘मिनी महाबळेश्वर’ अशी ओळख असलेल्या दापोलीचा पारा 8.8 इतका घसरला आहे. वाढत्या थंडीने पर्यटन क्षेत्रातील पर्यटक सुखावले असून, दापोलीतील ही थंडी पर्यटकांना पर्यटन क्षेत्रात येण्यासाठी खुणावू लागली आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार उत्तरेकडून येणार्या शीतलहरींमुळे संपूर्ण राज्यात थंडीचे परिणाम दिसून येत आहेत. ‘ऑक्टोबर हिट’मुळे उष्ण तापमानात वाढ झाली होती तर नोव्हेंबर महिन्यात थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. 25 नोव्हेंबरपासून दापोलीत तापमानात घसरण होऊ लागली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसागणिक थंडीचा कडाका वाढू लागला आहे. या वर्षी तापमान आणखीन खाली येत आहे. या वर्षीच्या निच्चांकी तापमानाची नोंद 8.8 अंश इतकी दापोलीत झाली आहे तर आणखी थंडी दापोलीत जाणवेल, असा अंदाज हवामान विभाग वर्तवत आहे.
या वर्षी थंडीची समाधानकारक चाहूल लागली असून, त्यामुळे दापोलीत पर्यटकांचा ओघ वाढत आहे. येथील भुरळ घालणार्या समुद्रकिनारी वाळूत पर्यटक या थंडीचा आनंद घेताना दिसत आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या आनंदात भर पडत आहे.
आताची थंडी आंबा काजू-पिकांना दिलासादायक असल्याने आंबा बागायतदार आणि शेतकरी सुखावले आहे तर असे वातावरण राहवे म्हणून अपेक्षाही व्यक्त करत आहेत. थंडीची चाहुल सुरू झाल्यापासून दापोली बाजारपेठेत उबदार कपड्यांना मागणी वाढत आहे तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेकोटीची ऊब नागरिक घेत आहेत. थंडीचा आणखी जोर वाढला तर नागरिकांना या थंडी पासून स्वतःची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
मागील काही दिवसांचे कमाल आणि किमान तापमान
दि. 25 नोव्हेंबर : कमाल 31.0 किमान 13.6
दि. 26 नोव्हेंबर : कमाल 31.3 किमान 11.5
दि 27 नोव्हेंबर : कमाल 30.5 किमान 10.5
दि 28 नोव्हेंबर : कमाल 31.1 किमान 9.9
दि 29 नोव्हेंबर : कमाल 30.6 किमान 9.0
दि 30 नोव्हेंबर : कमाल 31.7 किमान 8.8
फर्मान बटे, आंबा बागायतदार, कात्रण,दापोली.आताची थंडी आंबा पिकांसाठी अनुकूल आहे. यामुळे मोहोर धारणा चांगली होईल आणि आंबा पीक देखील शेतकर्यांना चांगले मिळेल. मात्र, वातावरणात आणखी काही वेगळे बदल झाले तर आंबा पीक संकटात येईल आणि पुन्हा नुकसानाला शेतकर्यांना सामोरे जावे लागेल.
