राज्यातील राजकरण मुख्यमंत्रीपदा भोवती फिरत असून याचा निर्णय दिल्ली, मुंबई व्हाया साताऱ्यातील दरेगाव होताना दिसत आहे. दरम्यान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद मिळणार नसल्याने गृहमंत्रीपदासह विधानसभेचे अध्यक्ष पद त्यांनी मागितल्याचे बोलले जात होते.
पण आता शिंदे यांनी थेट दरेगावातून आज (ता.१) पत्रकार परिषद घेत सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी आपला विश्वास भाजप नेतृत्वावर असून भाजपचा निर्णय आपल्यासह शिवसेनेला मान्य असल्याचे पुन्हा एकदा म्हटले आहे.
देशात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याबाबात जोरदार चर्चा रंगली असतानात शिंदे गावी गेल्याने ते नाराज असल्याच्या चर्चांना उधान आले होते. पण प्रकृती बरी नसल्याने गावी आल्याचे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले. तर आता विरोधकांकडे दुसरा मुद्दा नसल्याने ते आता नाराज असल्याच्या चर्चा घडवत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
शिंदे यांनी यावेळी, राज्यातील जनतेने महायुतीला दिलेल्या प्रेमामुळे विरोधकांना काहीच काम उरलेले नाही. आता तर त्यांच्याकडे विरोधीपक्ष नेता देखील नाही. यामुळे आता वेगळी ते काय चर्चा करणार असा निशाना साधला आहे. तर मी कॉमन जनतेचा कॉमन मॅन असणारा मुख्यमंत्री आहे. अडीच वर्षे मी कॉमन मॅन म्हणूनच काम केलं आहे. जनतेचे प्रश्न सोडवले आहेत.
राज्यातील जनतेसाठी अनेक योजना आणल्या असून त्याचा फायदा आज राज्यातील कोट्यवधी जनतेला मिळत आहे. यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत होते. आम्हाला प्रचंड यश मिळाले. आम्हाला लाडका भाऊ म्हणून लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांनी भरपूर प्रेम दिलं आहे.
आता कोणताच संभ्रम नसून फक्त लोकांसाठी काम करायचं आहे. आता जबाबदारी वाढली असून लोकांनी आमच्यावर जबाबदारी टाकली आहे. यामुळे ती जबाबदारी पेलत जनतेच्या अपेक्षा आम्हाला पूर्ण करायच्या आहेत. मी माझा निर्णय गेल्या आठवड्यातच जाहीर केला आहे. आता माझा निर्णय झाला असून मुख्यमंत्री कोण होणार? याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह घेतील, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.
म्हणून तब्बेत बिघडली
दरम्यान दरेगावात येण्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उडवल्यावरून त्यांनी समाचार घेतला आहे. सध्या विरोधकांकडे काहीच काम उरलेले नाही. त्यामुळे आता त्यांच्याकडे लक्ष न दिलेले बरे. तर निवडणुकीच्या कालावधीत रोज आठ, दहा सभा घेतल्याने आणि धावपळ केल्याने तब्बेत बिघडली होती. पण आता प्रकृती बरी असल्याचेही काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
