राज्यात महायुतीला बहुमत मिळालं असलं तरी अजूनही शपथविधी झालेला नाही. यातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दाढीवरून टीका केलीय.
शिवाजी महाराजांची दाढी शोभते. तुमची दाढी अफझलखानाची असल्याची टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली. या टीकेला शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं. संजय राऊतांना चांगल्या प्रकारे शिंदे साहेबांच्या दाढीची कल्पना आल्याचं शिरसाट म्हणालेत.
संजय शिरसाट म्हणाले की, अजून शिंदे साहेबांच्या दाढीने खरं रूप तुम्हाला दाखवलं नाहीय. दाढी पार्ट टू येईल तेव्हा तुमची खैर राहणार नाही. सध्या ज्या संयमाने एकनाथ शिंदे घेतायत ते पूर्ण महाराष्ट्र पाहतोय. जी काही बडबड संजय राऊत करतात त्यानंतर अनेकांचे आम्हाला फोन येतायत याचं थोबाड बंद करा. शिंदेंनी दाढीवर हात फिरवला तर संजय राऊतला बाजूच्या डंपिंग ग्राउंडवर बसायला लागेल.
संजय राऊत हे राज्यसभेला फक्त अर्ध्या मताने जिंकले. त्यांना चांगल्या प्रकारे एकनाथ शिंदे साहेबांच्या दाढीची कल्पना आली आहे. राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी राऊत हे एकनाथ शिंदे यांचे पाय धरत होते. तेव्हा शिंदे साहेबांनी दाढीवर हात फिरवला असता तर बोंबलायला सुद्धा जागा राहिली नसती. शिंदे साहेबांची ती चूक झाली असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं.
राज्यसभेवर संजय राऊतांना जाऊ द्यायला नको होतं. संजय सावंतला जाऊ दिलं पाहिजे होतं. संजय राऊतांनी तिथं जाऊन काय केलं? शिवसेना पक्षाचं वाटोळ केलं. शिवसेना प्रमुखांचं नाव घालवलं. शिवसेनेला हिंदुत्ववाद सोडायला लावला. हे सगळे जे काही प्रकार झालेत याची जाणीव ठाकरेंना होत नाही हे दुर्दैव असल्याची खंतही संजय शिरसाट यांनी व्यक्त केली.
