
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आयोजना संदर्भातील कळीच्या मुद्द्यावर अखेर तोडगा निघाला. गेल्या काही दिवसांपासून BCCI च्या मागणीच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अखेर ‘हायब्रिड मॉडेल’ प्रस्ताव मान्य केल्याची माहिती आहे.
म्हणजेच भारताचे सामने पाकिस्तान बाहेर खेळवण्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तयार झाला आहे. PCB ने हायब्रीड मॉडेल मान्य केले असले तरीही पाकिस्तानी क्रिकेटपटू मात्र सुधारण्याचे नाव घेत नाहीत. नुकताच पाकिस्तानचा वेगवान माजी गोलंदाज शोएब अख्तर याने एक विधान करून भारतीय चाहत्यांना डिवचण्याचे काम केले आहे.
काय म्हणाला शोएब अख्तर?
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचे सामने पाकिस्तान बाहेर खेळवायला तयार झाल्यानंतर, पाक क्रिकेट बोर्डाने अशी अट घातली की हा न्याय दोन्ही बाजूने समान असावा. म्हणजेच यापुढे भारतात एखादी ICCची स्पर्धा असेल तर पाकिस्तानचे सामने भारताबाहेर तटस्थ ठिकाणी खेळवले जावेत. पाक क्रिकेट बोर्डाच्या या अटीवर शोएब अख्तरने मत व्यक्त केले. “जेव्हा पाकिस्तानी संघ भारतात खेळण्याबाबतची चर्चा होते, त्याबाबत मी असे म्हणेन की आपण आपल्या बाजूने मैत्रीचा हात कायमच पुढे केला पाहिजे. माझं नेहमीच असं म्हणणं असतं की तुम्ही भारतात जा, त्यांच्याशी खेळा, ते आव्हान स्वीकारा आणि टीम इंडियाला भारतात जाऊनच ठोकून काढा, विजय आपला असू द्या… इतका साधा सरळ विषय आहे,” असे शोएब अख्तर एका टॉक शो मध्ये बोलला.
“तुम्हाला ICC कडून यजमानपदासाठी आणि खर्चासाठी ठराविक रक्कम दिली जात आहे ही बाब ठीक आहे. आम्ही ही गोष्ट समजून घेतो. पाकिस्तानची आताची भूमिका पूर्णपणे योग्य आहे. आम्ही आमच्या देशात चॅम्पियन्स ट्रॉफी सारखी मोठी स्पर्धा भरवण्यासाठी सक्षम आहोत. पण दुसरा संघ येण्यास नकार देत असेत तर त्याबद्दल होणारी नुकसान भरपाई ICC ने पाकिस्तानला दिली पाहिजे,” असेही अख्तरने सांगितले.
दरम्यान, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेबाबत पाक क्रिकेट बोर्डाने आणखी एक अट ठेवली. ‘हायब्रिड मॉडेल’च्या प्रस्तावानुसार, भारतीय संघाचे सर्व सामने आणि सेमी फायनल, फायनल लढत ही दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. हा प्रस्ताव पाकिस्तानला मान्य आहे. पण जर भारतीय संघ आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या सेमी किंवा फायनलपर्यंत पोहचला नाही तर या लढती लाहोरमध्ये घेण्याची परवानगी मिळावी, अशी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची पहिली अट ठेवली आहे.