
गाबा येथील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर पाच सामन्यांची मालिका भारताच्या बाजूने वळाली आहे. मात्र गाबा कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजांना अनुकुल खेळपट्टीवर भारतीय संघाला जास्त धावा न करू दिल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने आनंद व्यक्त केला.
हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहिला.
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना कमिन्स म्हणाला, “मी कधीही लयीत असण्याबद्दल चिंतित नसतो. मला त्याची कधीच पर्वा नसते. मला वाटतं की या आठवड्यात आम्ही आमच्या कामगिरीतून बरंच काही साध्य करू शकतो.” कमिन्स म्हणाला, “आमच्या फलंदाजांनी दोन उत्कृष्ट भागीदारी केली. जेव्हा आम्हाला नवीन विकेटवर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं तेव्हा आम्ही 450 (445) धावा केल्या आणि विकेट फलंदाजांना कमी साथ देत असताना भारताला 250 (260) धावांवर बाद करण्यात यशस्वी झालो. या कामगिरीनं आम्हाला खूप प्रेरणा मिळू शकते.”
गाबा कसोटी संपल्यानंतर भारताचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननं निवृत्तीची घोषणा करून कमिन्ससह सर्वांनाच चकित केलं. ऑस्ट्रेलियन कर्णधार म्हणाला, “हे नक्कीच थोडं धक्कादायक होतं. तो निश्चितच महान खेळाडू आहे. फार कमी ऑफस्पिनर्स आहेत ज्यांनी इतके दिवस आपली छाप सोडली आहे. तो सर्वकाळातील महान खेळाडूंमध्ये गणला जाईल. आमचा संघ त्याचा खूप आदर करतो.”
कमिन्सनं पावसामुळे अनिर्णित राहिलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याबाबत निराशा व्यक्त केली आहे. तो म्हणाला, “आम्हाला अनेक वेळा आत-बाहेर जावं लागले. यापूर्वी असं कधी घडल्याचं मला आठवत नाही. हे निराशाजनक होतं.” कमिन्सनं असंही सांगितलं की, वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतीमुळे यापुढे या मालिकेत खेळू शकणार नाही. परंतु स्नायूंच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेला ट्रॅव्हिस हेड पुढील सामन्यासाठी तंदुरुस्त होईल अशी आशा आहे. कमिन्स म्हणाला, “जोश यापुढे मालिकेत खेळू शकणार नाही. ट्रॅव्हिसचं म्हणणं आहे की तो लवकरच फिट होईल. त्याला स्नायूंचा ताण आहे, पण तो मेलबर्न कसोटीसाठी (26 डिसेंबरपासून) तंदुरुस्त असेल.”