
ममता बॅनर्जी अन् अरविंद केजरीवालांचं ठरलं, पवारांचीही भूमिका महत्त्वाची…
इंडिया आघाडीमध्ये कुणाचं चालणार, कुणाच्या शब्दाला वजन प्राप्त होणार, हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? किंवा इतर पक्ष काँग्रेसला बाहेर ढकलणार का?
असे प्रश्न सध्या चर्चिले जात आहेत.
इंडिया आघाडीची कमान आपणच सांभाळणार असल्याचं विधान ममत बॅनर्जी यांनी केलं आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. इंडिया आघाडीच्या नेतृत्वाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस बॅकफुटवर गेल्याचं दिसतंय. कारण अखिलेश यादव, शरद पवार, अरविंद केजरीवाल आणि लालू प्रसाद यादव यांच्यासह अनेक नेते ममता बॅनर्जी यांच्या बाजूने उभे आहेत. हे सर्व नेते ममतांकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व देण्यासाठी तयार आहेत.
सध्यातरी इंडिया आघाडीची कमान काँग्रेसकडे आहे. परंतु भविष्यात हे नेतृत्व इतर पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षाने तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढण्याची मागणी केली आहे. त्याचं कारण ठरलं आहे दिल्ली निवडणूक.
दिल्लीच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने एकमेकांविरोधात तलवार उपसली आहे. दोन्ही पक्ष समोरासमोर आलेले असताना अरविंद केजरीवाल यांच्याकडून काँग्रेसवर हल्ला करण्याची एकही संधी सोडली जात नाहीये. केजरीवालांविरोधात काँग्रेस नेत्याने तक्रार दिल्यानंतर वाद आणखी उफाळला.
काँग्रेस नेते अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांना अँटी नॅशनल म्हटलं. एवढंच नाही तर काँग्रेसने संदीप दीक्षित यांना केजरीवालांच्या विरोधात उभं केलं. त्यामुळे आम आदमी पक्षाचा संताप झाला आहे. पक्षाने काँगेसविरोधात युद्धच पुकारलं आहे. काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढण्याची मागणी करण्यात आली आहे.