
पोलिसांनी काय म्हटलं?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले नाव वाल्मिक कराड यांनी पुणे सीआयडीकडे काल (मंगळवार) शरणागती पत्करली. त्यानंतर त्यांना बीड येथील केज न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्यांना १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सध्या कराड बीड शहर पोलिस स्टेशनमधील जेलमध्ये आहेत.
शहर पोलीस ठाण्यात पाच पलंगांची व्यवस्था
कराड यांना बीड पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आल्यानंतर तातडीने पोलिस ठाण्यात पाच नवीन पलंगांची व्यवस्था करण्यात आली. या पलंगांची व्यवस्था आरोपींसाठी करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, पोलिसांनी ही व्यवस्था स्वतःसाठी असल्याचे स्पष्ट केले आहे.
कराड यांचा आत्मसमर्पणपूर्व व्हिडिओ
पुणे सीआयडी कार्यालयात जाण्यापूर्वी कराड यांनी एक व्हिडिओ जारी करत म्हटले, “माझ्या विरोधात एक खोटा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मी पुण्यात सीआयडी अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण करत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येतील दोषींना कडक शिक्षा होणे आवश्यक आहे. मात्र, राजकीय वैरामुळे माझे नाव या प्रकरणात ओढले जात आहे.”
सरपंच हत्या प्रकरणात आंदोलन
या हत्येच्या निषेधार्थ बीड शहरात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी मौन मोर्चा काढला होता. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह सत्ताधारी महायुतीतील काही आमदारही या आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी विरोधी पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कराड यांच्याशी जवळीक असल्याचा आरोप केला आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचा संताप
संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी कराड यांच्या अटकप्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटले, “आरोपी जर आत्मसमर्पण करत असेल, तर पोलीस अद्याप काय करत होते?” त्यांनी पोलिसांनी सर्व आरोपींच्या कॉल डिटेल्सची चौकशी करावी, अशी मागणीही केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे यांचे मत
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणात पारदर्शक चौकशी होण्याची गरज व्यक्त केली. “जर कराड यांचा खुनाशी संबंध आढळला, तर त्यांनाही या प्रकरणात अटक होईल,” असे सोनवणे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा इशारा-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड प्रकरणावर कडक भूमिका घेतली आहे. “गुंडाराज सहन केला जाणार नाही. दोषींना फाशी होईपर्यंत पोलीस तपास करत राहतील. बीडमधील सर्व आरोपींना शोधून काढले जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.