
आता राष्ट्रवादीही धनुभाऊंवर नाराज, बड्या नेत्यांचे वेगळेच संकेत..
बीडच्या मस्साजोग गावात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत. याप्रकरणावरुन महाराष्ट्र राजकारण तापलं असतानाच, आता धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
कारण, मस्साजोग प्रकरणावरुन सरकारची बदनामी होत असल्याने महायुतीसह राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेतेही धनंजय मुंडे यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जाते.
बीडच्या मस्साजोग प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापलंय. पण, या तापलेल्या राजकारणाचे चटके राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांना बसण्याची अधिक शक्यता आहे. कारण, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर महायुतीतील वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती मिळतेय. धनंजय मुंडे यांनी बीड प्रकरण योग्यरित्या हाताळले नसल्याचे मत वरिष्ठांनी व्यक्त केल्याचे कळते. तर मस्साजोग प्रकरणामुळे बदनामी होत असल्याचे वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. विरोधकांनी याप्रकरणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत, सरकारची कोंडी केल्याचे पाहायला मिळते आहे.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची अनेकांची मागणी, पण मराठवाड्यातील मोठा समाज नाराज होऊन वेगळा मेसेज जाण्याची भीती
पण, मुंडे यांचा राजीनामा घेतल्यास एक मोठा समाज नाराज होऊन त्यातून राज्यात वेगळा मेसेज जाईल, अशीही भीतीही महायुतीला आहे. पण, धनंजय मुंडे यांनी काही गोष्टी टाळल्या असत्या तर हे प्रकरण एवढं वाढले नसते, असेही महायुतीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. पण, केवळ महायुतीचे मित्रपक्षच नव्हे तर, धनंजय मुंडे यांच्यावर स्वपक्षीयांचीही नाराजी ओढवल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी तसे स्पष्ट संकेतच दिले आहेत.
सात आरोपींपैकी तीन आरोपी फरार, त्यामुळे धनंजय मुंडे यांची अडचण दूर होण्याची शक्यता कमी
बीड सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड शरण आल्यानंतर दररोज नवनवीन खुलासे होतायेत. पण, याप्रकरणात 7 आरोपींपैकी 3 आरोपींचा अजूनही तपास लागलेला नाही.. त्यामुळे तुर्तास तरी हे प्रकरण शांत होण्याची आणि धनंजय मुंडे यांची अडचण दूर होण्याची शक्यता कमी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.