
मलवडीचा युवा पैलवान जय कुंभारचं आकस्मिक दु:खद निधन..!
जय याचे पार्थिव आल्यावर कुटुंबीयांना हा धक्का पचविणे जड जात होते. जय याच्या आईचा टाहो उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकत होता.
दहिवडी : माण तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रावर दु:खाचा डोंगर कोसळावा, अशी अतिशय दु:खद घटना आज घडली.
मलवडीचा युवा पैलवान जय दीपक कुंभार (वय १४ वर्षे) याचे आकस्मिक निधन झाले. या घटनेने (Young Wrestler Jai Kumbhar Passes Away) मलवडी पंचक्रोशीसह माण तालुका हळहळला.
येथील हाॅटेल व्यावसायिक दीपक कुंभार यांनी आपल्या एकुलत्या एका मुलाला म्हणजेच जयला पैलवान बनवायचे या ध्येयाने जय याला लहानपणापासून घडवले. ५ ऑगस्ट २०१० रोजी जन्मलेल्या जय याने मलवडी, आंधळी येथे सराव करताना कुस्तीत चुणूक दाखवली. त्यानंतर त्याला झिरपवाडी व तिथून पुढे पुणे येथील जाणता राजा कुस्ती संकुल (Janta Raja Wrestling Complex) येथे सराव व प्रशिक्षणासाठी ठेवले.
जय याने सुध्दा वडिलांच्या कष्टाचे चीज करत नावलौकिक मिळवला. शालेय कुस्ती स्पर्धेत सलग दोन वर्षे त्याने १४ वर्षे वयोगटात राज्यपातळीवर तिसरा क्रमांक मिळवला. तर, यावर्षी १७ वर्षे वयोगटात ६२ किलो वजनीगटात विभाग पातळीवर तिसरा क्रमांक मिळवला. नुकत्याच झालेल्या श्री खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित मलवडीच्या कुस्ती मैदानात नेत्रदीपक कुस्ती करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
महाराष्ट्र केसरीसह ऑलिम्पिक पदक मिळवायचे हे ध्येय घेऊन वाटचाल करत असलेल्या जयसह दिपक कुंभार यांचे स्वप्न आज भंगले. आज सकाळी सराव केल्यानंतर आकस्मिक जय याचे निधन झाले. ही दु:खद घटना समजल्यावर संपूर्ण मलवडी व परिसर शोकसागरात बुडाला. पुण्यासह माण तालुक्यातील जय याच्या चाहत्यांनी व पैलवानांनी मलवडीकडे धाव घेतली.
जय याचे पार्थिव आल्यावर कुटुंबीयांना हा धक्का पचविणे जड जात होते. जय याच्या आईचा टाहो उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकत होता. एकुलत्या एका कर्तृत्ववान मुलाच्या जाण्याने दीपक कुंभार खचून गेले होते. जय याच्या अंत्यदर्शनाला हजारोंच्या संख्येने जमाव उपस्थित होता.