
कार असणाऱ्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार; मंत्री अदिती तटकरेंची माहिती
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासन निर्णयात कोणताही बदल केला जाणार नाही. मात्र अर्जांची पडताळणी केली जाईल. त्यात कुटुंबाचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या व इतर नियमात न बसणारे अर्ज बाद केले जातील.
मात्र पूर्वीच्या शासन नियमात कोणताही बदल केला जाणार नाही,’अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.Aditi Tatkare
मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना तटकरे म्हणाल्या, ‘काही अर्जांच्या बाबतीत तक्रारी आल्या होत्या, त्याची आम्ही पडताळणी करत आहोत. आधार कार्ड मिस मॅचच्या तक्रारी होत्या. ज्यांचे आधार कार्डवरील नाव व बँक खात्यावरील नाव जुळत नाही, अशा बहिणींना यापुढे पैसे मिळणार नाहीत. ज्यांच्या नावावर चारचाकी वाहने आहेत, त्यांनीही अर्ज केले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती घेतली जाईल. ज्यांच्या कुटुंबात आयकर भरला जातो, अशा महिलांची नावेही वगळण्यात येतील, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. काही महिलांकडून ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज आले होते. काही महिलांचे लग्नानंतर दुसऱ्या राज्यात स्थलांतर झाले आहे.
२१०० रुपये कधी मिळणार, हा प्रश्न अनुत्तरितच
सध्या राज्यातील २ कोटी ४० लाख महिलांना या योजनेतून दरमहा १५०० रुपये अर्थसाह्य मिळत आहे. जुलैपासून ६ हप्ते जमा करण्यात आले आहेत. ही रक्कम २१०० रुपये करण्याचे आश्वासन महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिले होते. आता त्याची अंमलबजावणी कधी करणार? या प्रश्नाचे उत्तर तटकरे यांनी दिले नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुरी मिळाल्यानंतर कदाचित ही वाढीव रक्कम मिळण्याची शक्यता आहे.