
थेट कोठडीत जाणारा बालाजी तांदळे कोण..?
पवनचक्की खंडणी प्रकरणात २१ दिवस फरार राहून शरणागतीनंतर सध्या वाल्मीक कराड बीड शहर ठाण्यातील सीआयडीच्या कोठडीत आहे. दरम्यान, कराडला भेटायला आलेल्या एकाने सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना खून प्रकरणातील फरारी सुदर्शन घुलेचा फोटो दाखविला, असा दावा धनंजय यांनी केला आहे.
धनंजय देशमुख यांनी याबाबत पोलिस अधीक्षकांना तक्रार केली आहे. विशेष म्हणजे संबंधिताने महिला पोलिस कर्मचाऱ्याशीही हुज्जत घातली. काही पोलिस कर्मचाऱ्यांना आपण सीआयडीसोबत असल्याचे सांगितले, तर काही कर्मचाऱ्यांना सीआयडीचे चालक असल्याचे सांगितले. बालाजी तांदळे (रा. कोरेगाव, ता. केज) असे त्याचे नाव आहे.
महिला कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घातल्याचे सांगत असताना येथील पोलिस अधिकारी दराडे यांनी देशमुख व श्रीमती रेडेकर यांनाच आवाज कमी करा, असा दम भरला आणि तांदळेला वेगळ्या खोलीत नेऊन बसवल्याचेही नमूद केले आहे. ता. ११ डिसेंबर रोजी मस्साजोग येथील आवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पाला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्यावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड, विष्णू चाटे व सुदर्शन घुले या तिघांवर गुन्हा नोंद आहे.
गुन्ह्यानंतर कराड २१ दिवस फरार होता. सर्व यंत्रणा मागे व शासनाच्या नावाने शंख वाजत असताना त्याला त्याच्या काही समर्थकांनी फरारी राहण्यासाठी वाहन, पैसे, नियेाजन, संपर्क अशी विविध मार्गांनी मदत केली. आता कोठडीत असतानाही त्याच्यासोबत काहींचा वावर असल्याचे समोर येत आहे.
दहशतीखाली आणण्याचा प्रयत्न
कराडला अटक केल्यानंतर तो मंगळवार – बुधवारच्या मध्यरात्रीपासून शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत आहे. संतोष देशमुख यांचे बंधू तपासाच्या अनुषंगाने भेटायला आल्यानंतर त्याच वेळी बालाजी तांदळेही तिथे होता. त्यांनी देशमुख यांना ‘तू इथे काय करायला?’ असे विचारत कराड असलेल्या पोलिस कोठडीकडे गेला. परतल्यानंतर खून प्रकरणातील सुदर्शन घुलेचा फोटो दाखवून आपल्याला दहशतीखाली घेण्याचा प्रयत्न करून आपल्याशी संतापजनक वक्तव्य केले. या ठिकाणी तांदळे यांनी कोणाला आपण सीआयडीचे वाहनचालक असल्याचे सांगितले तर काहींना आपण सीआयडीसेाबत असल्याचे सांगितल्याचे धनंजय देशमुख यांनी तक्रारीत म्हटले आहे.