
भुजबळ-फडणवीसांच्या एकत्रित प्रवासानंतर चर्चांना उधाण, पडद्यामागे नेमकं काय घडतयं?
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील चाकणमध्ये त्याच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला छगन भुजबळ आणि शरद पवार या दोघांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे.
त्यामुळे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. मात्र त्यापूर्वी महाराष्ट्रात एक मोठी घडामोड घडली आहे. छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केला आहे.
साताऱ्यातील नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ उपस्थित आहेत. यावेळी दोघेही एकाच गाडीतून कार्यक्रमस्थळी दाखल झाले. यावेळी देवेंद्र फडणवीस चालकाच्या बाजूच्या सीटवर, तर छगन भुजबळ मागच्या सीटवर बसले असल्याचं दिसून आलं आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळ पक्षात नाराज आहेत. त्यांनी अनेकदा माध्यमांसमोर त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी अजित पवार यांनाही लक्ष्य केलं आहे. अशातच आता छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.
काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ नाराज असून लवकरच भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा होती. त्यानंतर आता दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित आहेत. यासंदर्भात विचारलं असता, अजित पवार या कार्यक्रमाला येणार आहेत की नाही, हे आपल्याला माहिती नाही. ते परदेशात आहेत, ते येतील की नाही हे माहिती नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली.
दरम्यान, आज सांयकाळी पुण्याजवळील चाकणमध्ये महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्यापूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी छगन भुजबळ आणि शरद पवार उपस्थित राहणार असून दोघेही एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.