
विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची मागणी…
शेतकऱ्यांच्या भरवशावर निवडणूक जिंकल्याचा दावा करणाऱ्या महायुती सरकारने आता दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमाफी द्यावी तसेच लाडक्या बहिणींना २ हजार १०० रुपये द्यावेत, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी नागपुरात केली केली.
महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या पारड्यात मते टाकली. या जनमताचा सन्मान करणे सरकारचे काम आहे. लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांची मदत देण्याची घोषणा या सरकारने केली होती. तसेच सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल असे सांगितले होते.
आता याबाबत तडक निर्णय का घेतला जात नाही, असाही सवाल त्यांनी केला. धान खरेदीची मुदत संपली आहे. ती वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. बाकीचे मंत्री सध्या कोमात गेल्यासारखे वाटतात. अनेकांनी तर अजून पदभार स्वीकारलेला नाही. बंगला वाटपावरून, अधिकार, खात्यावरून भांडण सुरू आहे, असे ते म्हणाले.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे आहेत. त्यामुळे त्यांनाच जिल्ह्याचे पालकमंत्री नेमले असले तर कोणाची हरकत असण्याचे कारण नाही. जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत. मात्र, पालकमंत्री नेमले जात नाही. काय चालले आहे हेच कळत नाही असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २६ जानेवारीला सर्व जिल्ह्यांत तिरंगा फडकवावा, असा टोला त्यांनी लगावला.
बीडचे पोलिस प्रमुख किंवा जिल्हाधिकारी नेमताना मर्जीतला माणूस दिला जातो. कराडाला बाप मानून पोलिस वागत होते. २२ दिवस त्याला पोलिस पकडू शकले नाही. यात गृह खात्याची प्रतिमा मलिन झाली आहे. याकडे लक्ष दिले नाही तर पोलिस खात्याचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.
सरपंच देशमुख यांच्या खुनाचा तपास सीआयडीकडे होता. नंतर एसआयटी नेमली. त्यामुळे घोळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे काय करायचे ते करा मात्र आरोपी सुटू नये आणि ९० दिवसांच्या आत कोर्टात चार्जशिट दाखल करण्याची दक्षता घ्यावी, असा सल्ला वडेट्टीवार यांनी सरकारला दिला.