
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. 24 डिसेंबरला धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याने सीआयडीकडे सरेंडर केल्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणातीन दोन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
देशमुख यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना बीड पोलिसांच्या विशेष पथकाने पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. या सगळ्यावरून वाल्मिक कराड आणि इतर आरोपींचे धनंजय मुंडे यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला जातोय. याबाबतचे त्यांचे काही फोटोही समोर आले आहेत. शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांचाही आरोपींसोबतचा फोटो समोर आला आहे.
या सगळ्या प्रकरणावर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अशाप्रकारे व्हायरल झालेल्या आरोपींसोबतच्या फोटोंवर भाष्य केलं आहे. अशाप्रकारे जुने फोटो व्हायरल करणं आणि त्याच्याशी गुन्ह्याशी लिंक करणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते.
वाल्मिक कराडचे राजकीय नेत्यांसोबत व्हायरल झालेल्या फोटोंवर प्रतिक्रिया विचारली असता रोहित पवार म्हणाले की, धनंजय मुंडे आमच्या पक्षातील मोठे नेते होते. आता ते अजित पवारांसोबत आहेत. एखादा कार्यकर्ता माझ्या जवळचा आहे. तो माझा निष्ठावंत असतो. त्यामुळे त्याच्याच हातात सगळा कारभार देणं योग्य नाही. अशा कार्यकर्त्यांसोबत अनेकांचे फोटो असतात. आमचे देखील फोटो त्याच्यासोबत असतील. दिशाभूल झाली असेल. त्यामुळे कुणाचे फोटो कोणाबरोबर आहेत, हे महत्वाचं नाही.
ज्यावेळी आम्ही एखाद्या कार्यक्रमाला जातो, अशावेळी अनेकजण फोटो काढत असतात. देवेंद्र फडणवीस किंवा शरद पवार यांच्यासोबत देखील अनेकजण असे फोटो काढतात. पण अशा फोटोंचे लिंकिंग करणं योग्य नाही. अशा लोकांवर योग्य कलम लावून योग्य कारवाई झाली पाहिजे, असं रोहित पवार म्हणाले. बीड प्रकरणावर रोहित पवार पुढे म्हणाले, बीड प्रकरणात आरोप प्रत्यारोप होत आहेत, पण आरोपी कोण आहे, हे महाराष्ट्राला कळलं आहे. अनेक आरोपी पकडले आहेत अजून एक आरोपी फरार आहे. या प्रकरणी त्याला अटक करून कडक कारवाई झाली पाहिजे. परत असं कोणी करू नये, अशी आरोपींना शिक्षा द्यावी, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.