
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीड पोलिसांनी शनिवारी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी देशमुख खून प्रकरणातील दोन मुख्य आरोपींच्या पुण्यातून मुसक्या आवळल्या आहेत.
त्यांना बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली आहे. आता त्यांना केज न्यायालयात हजर केलं जात आहे. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. हे दोन्ही आरोपी मागील 26 दिवसांपासून फरार होते. बीड पोलिसांची अनेक पथकं महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पाठवली होती. तरीही आरोपींचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता.
अखेर या दोन्ही आरोपींना बिळातून बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. यांना बाहेर काढण्यात दोन दिवसांपूर्वी अटक केलेल्या डॉक्टरची जबानी महत्त्वपूर्ण ठरल्याचं सांगितलं जातंय. गुरुवारी बीड पोलिसांनी डॉ. संभाजी वायबसे आणि त्याच्या वकील पत्नीला ताब्यात घेतलं होतं. यातील डॉ. वायबसे यानं हत्येच्या दिवशी मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्याशी फोनवरून संपर्क साधला होता.
या आरोपींना पळवून लावण्यात आणि त्यांना पैशांची मदत केल्याचा आरोप संभाजी वायबसे याच्यावर आहे. पोलिसांनी गुरुवारी वायबसे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली. यानंतर पोलिसांनी वायबसे याच्या वकील पत्नीलाही ताब्यात घेतलं. एसआयटीनं शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत या दाम्पत्याची कसून चौकशी केली. यावेळी पोलिसांनी डॉक्टरला चौकशीचं ‘इंजेक्शन’ टोचताच वायबसे याने आरोपींचा ठावठिकाणा पोलिसांना सांगितला. यानंतर पोलिसांनी शनिवारी पहाटे पुण्यातून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याला अटक केली.
आता या दोन्ही आरोपींची बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात जवळपास दोन तास चौकशी केली आहे. यानंतर पोलिसांनी दोघांनाही वैद्यकीय चाचणीसाठी नेलं आहे. आज त्यांना केज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. इथे सरकारी वकील म्हणून अॅड. बाळासाहेब कोल्हे बाजू मांडणार आहेत. आता आरोपींबाबत कोर्ट काय निर्णय देणार? आरोपींना किती दिवसांची पोलीस कोठडी मिळणार? हे पाहावं लागणार आहे.