
पवार साहेब आणि मी एका व्यासपीठावर एकत्र येणार अशा अनेक चर्चा रंगल्या होत्या. आम्ही चांगल्या कामासाठी, कार्यक्रमासाठी एकत्र येतो. आज महात्मा जोतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी आम्ही एकत्र आलो हे महत्वाचे आहे.
आम्ही दोघे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या होत्या. अनेकांना त्याचे आश्चर्य वाटले .त्यामुळे राजकीय चिंता करण्याची गरज नाही. असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भाषणात आज सांगितले.
चाकण ता. खेड येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. या पूर्णा कृती पुतळ्याच्या अनावरणानंतर जाहीर सभा झाली. त्या सभेत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
यावेळी आजी, माजी आमदार खासदार व विविध पक्षाचे इतर मान्यवर, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षफुटी नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ धरलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व ज्येष्ठ नेते शरद पवार चाकण येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर येणार त्यांच्यात काय चर्चा होणार अशा चर्चा रंगल्या होत्या.
या चर्चांना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भाषणात पूर्णविराम दिला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भाषणात सांगितले की, ‘या कार्यक्रमाला पवार साहेबांना बोलावलं हे योग्य झाल. पवार साहेब मुख्यमंत्री असताना भिडेवाड्याचे नूतनीकरणं केले. मंडल आयोगाची अंमलबजावणी पवारसाहेब यांनी केली.
मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव पवार साहेब यांनी दिले.महात्मा फुलेनी शेतकऱ्यांसाठी काम केले. झिरपे तलाव करा, शेतकऱ्यांना बि- बियाणे द्या हे महात्मा फुलें नी ब्रिटिश राजकर्त्यांना सांगितले. शेतकऱ्याला शिक्षित करावं, शिक्षणात शेतीचा समावेश करण्यासाठी ब्रिटिश सरकारकडे महात्मा फुलेनी पाठपुरावा केला. पशुहत्या बंद करावी. महात्मा फुले यांनी अनेक कामे केली.आमच्याच लोकांनी त्यांना विरोध केला.’
या कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील उल्लेखनीय कामांचे तोंड भरून कौतुक केले. शरद पवार यांच्याकडे पाहिल्यानंतर महात्मा फुलेंच्या विचारधारेची, त्यांच्यावरील अभ्यासाची जाणीव होते. पवार साहेब म्हणजे शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराच्या प्रेरणेने आचरण करून महापुरुषांच्या विचाराचा प्रसार करणारे जेष्ठ नेते आहेत.