
तरुणाची उपमुख्यमंत्र्यांना धमकी, ठाण्यातील खळबळजनक प्रकार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका तरुणाने इन्स्टाग्रामवर लाईव्ह स्ट्रिमिंग करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. एकनाथ शिंदे यांना गोळ्या घालून ठार करू, अशा प्रकारची धमकी आरोपीनं दिली आहे.
याप्रकरणी ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून धमकी देणाऱ्या तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच श्रीनगर पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवली असून धमकी देणाऱ्या तरुणाची ओळख पटवली आहे. हितेश धेंडे असं धमकी देणाऱ्या 24 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो ठाण्यातील वरळी पाडा परिसरातील रहिवासी आहे. आरोपीनं इन्स्टाग्रामवर एकनाथ शिंदे यांना धमकी देताना, त्यांच्यासह कुटुंबाबद्दल अपशब्दांचा वापर केला आहे. तसेच शिंदे यांना गोळ्या घालून ठार मारू अशी धमकीही आरोपीनं दिली आहे.
उपमुख्यमंत्र्यांना अशाप्रकारे धमकी दिल्याची घटना उघडकीस आल्यानंतप याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं रवाना केली आहेत. मुंबईसह विविध ठिकाणी आरोपीचा शोध घेतला जातोय. आरोपीनं एकनाथ शिंदे यांना नेमकी धमकी कशामुळे दिली? यामागे नक्की काय कारण आहे? याची माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
खरंतर, काही दिवसांपूर्वी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील वांद्रे परिसरात गोळ्या घालून हत्या केली होती. सलमान खानशी कथित संबंध असल्याच्या आरोपातून त्यांची हत्या केली होती. याप्रकरणात कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचं उघड झालं होतं. काही दिवसांपूर्वी राजकीय नेत्याची झालेली हत्या पाहता, एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या धमकीमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत. धमकीचं नेमकं कारण शोधलं जात आहे.