
मार्गिकेची कामे जलदगतीने सुरू; कारशेडचा तिढा सुटेना…
मुंबई महानगरात येत्या पाच वर्षांत जवळपास ३३७ किमी लांबीचे मेट्रो जाळे उभे राहणार असून, सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून आठ मेट्रो मार्गिकेंची कामे सुरू आहेत.
यातील दोन मेट्रो नव्या वर्षात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. त्यामध्ये मेट्रो ९ मधील दहिसर पूर्व ते काशीगाव मार्गिका आणि मेट्रो २ बीमधील डायमंड गार्डन (चेंबूर) ते मंडाळे या मार्गिकेचा समावेश आहे. दुसऱ्या बाजूला मेट्रो ४, मेट्रो ६, या दोन मार्गिकांसाठी कारशेडची जागा अजूनही मिळालेली नाही, तर मेट्रो ९ आणि मेट्रो ५ च्या कारशेड उभारणीला हल्लीच सुरुवात झाली आहे. त्यातून ही कामे पूर्ण होण्यासाठी आणखी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागेल, असे सांगितले जात आहे.
वडाळा कासारवडवली मेट्रो ४ आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो ४ अ मार्गिका
मार्गिकेची लांबी – ३५ किमी
स्थानके – ३२
कामांची सद्य:स्थिती – मेट्रो ४ चे ७५ आणि ४ ‘अ’चे ८६% स्थापत्य काम पूर्ण
कारशेड – मोघरपाडा येथील जागा अजून मिळाली नाही.
स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मेट्रो ६
मार्गिकेची लांबी – १४.५ किमी
स्थानके – १३
कामांची सद्य:स्थिती – ७७% स्थापत्य काम पूर्ण
कारशेड – कांजूरमार्ग येथील कारशेडची जागा अद्याप ताब्यात नाही.
कल्याण ते तळोजा मेट्रो १२
मार्गिकेची लांबी – २३.७ किमी
स्थानके – १९
कामांची सद्य:स्थिती – ४% काम पूर्ण
कारशेड – निळजे येथील डेपोच्या जमिनीचे अंशत: अधिग्रहण.
डी.एन. नगर ते मंडाळे मेट्रो २ बी
मार्गिकेची लांबी – २३.६ किमी
स्थानके – १९
कामांची सद्य:स्थिती – ७८% स्थापत्य कामे
कारशेड – मंडाळे येथील डेपोचे ९७% काम पूर्ण
ठाणे- भिवंडी- कल्याण मेट्रो ५
मार्गिकेची लांबी – २४.९ किमी (पहिला टप्पा ११.९ किमी)
स्थानके – १४ (पहिला टप्पा ६ स्थानके)
कामांची सद्य:स्थिती – मेट्रो ५ च्या पहिल्या टप्प्याचे ९४% काम पूर्ण
कारशेड – कशेळी येथील काही जागा मिळणे बाकी.
दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो ९ आणि अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो ७ अ
मार्गिकेची लांबी – १३.५ किमी
स्थानके – १०
कामांची सद्य:स्थिती – मेट्रो ९ चे ९२ टक्के, मेट्रो ७ अचे ४६% काम पूर्ण
कारशेड – डोंगरी येथील कारशेडचे काम नुकतेच सुरू.