
सत्ताधारी आणि विरोधकांनी राजीनाम्याची मागणी लावून धरलेली असताना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली.
उभय नेत्यांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली. बैठक संपवून बाहेर पडल्यानंतर मात्र अजित पवार यांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
वाल्मिक कराड याच्यासोबत संबंध असल्याने आणि कराड खंडणी प्रकरणात अटकेत असल्याने धनंजय मुंडे यांचा राजीनामा विरोधकांसहित सत्ताधारी पक्षाचे आमदार मागत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले. बाहेर प्रचंड मीडियाचा गराडा असल्याने मोजक्या प्रश्नांची उत्तरे देऊन काही मिनिटांतच धनंजय मुंडे यांनी तेथून काढता पाय घेतला.
अजितदादांच्या भेटीचे कारण काय?
आपण दादांची भेट घेण्याकरिता गेला होतात, राजीनाम्यावर काही चर्चा झाली का? असे धनंजय मुंडे यांना विचारले असता, दादांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो. आमच्या दोघांत राजीनाम्यावर शब्दानेही चर्चा झाली नाही, असे सांगत राजीनाम्याच्या चर्चांचे खंडन धनंजय मुंडे यांनी केले
अजित पवार परदेशात गेले होते. ते आज मुंबईत आहेत. मी प्रत्यक्ष मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच अजित पवार यांची भेट घेतली. अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी घेतल्यानंतर खात्याची स्थिती आणि आढावा मी दादांना भेटून दिला, असे भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी सांगितले.
एसआयटी स्थापन झालीये, चौकशी होऊ द्या
विविध पक्षाच्या आमदारांनी बीडच्या प्रकरणावर एसआयटी चौकशी झाली पाहिजे, अशा मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नेमली आहे. तपास चालू आहे, तपास होऊ द्या. तपासानंतर ज्या गोष्टी समोर येतील, त्यानंतर ठरवू, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
कुणाकुणाची तोंडं धरू?
माझ्यावर कोण कोण आरोप करतंय, याबद्दल मी बोलणार नाही. लोकशाहीत त्यांना अधिकार आहे. मी कुणाकुणाचे तोंड धरू? असे विचारतानाच ज्या पक्षाचे आमदार माझ्यावर बोलत आहेत, त्यांच्या पक्षाध्यक्षांना तुम्ही विचारले पाहिजे, असा सल्ला धनंजय मुंडे यांनी माध्यमांना दिला.