
धनंजय मुंडेंची थेट प्रतिक्रिया..!
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचे यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर कराड पुण्याच्या सीआडी कार्यालयात शरण आले होते.
त्यांना 14 दिवसाची कोठडी सुनावण्यात आली होती.या सर्व घडामोडीनंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांची राळ उठवून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र आज धनंजय मुंडे यांनी मी राजीनामा दिलेला नाही,असे स्पष्ट केले आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी आज मंत्री धनंजय मुंडे मंत्रिमंडळात आले होते. त्यावेळेस धनंजय मुंडे यांना पत्रकारांनी घेरून तुम्ही अजित पवारांकडे राजीनामा सोपवला का? अस सवाल केला होता. यावर धनंजय मुंडे यांनी मी राजीनामा सोपवला नाही, अशी माहिती दिली.
विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी आरोपांची राळ उठवल्यानंतर चहूबाजूंनी कोंडीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिल्याची माहिती सोमवारी समोर आली होती. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार हे तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले. दोघांमध्ये सागर बंगल्यावर २५ मिनिटे चर्चा झाल्यानंतर अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरील निर्णय राखून ठेवला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती.
महाराष्ट्राच्या जनतेला मुर्खात काढत आहात का?
संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांच्याकडे जावं लागणं हे दुर्दैव. जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्यामध्ये इतकं काय आहे की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काहीच भूमिका घेत नाहीत.
धनंजय मुंडे ओबीसी समाजाचे आहेत म्हणून सरकार ठोस भूमिका घेत नाही का? संतोष देशमुख यांच्या हत्येला जातीय रंग देऊ नये.अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट केवळ नवीन वर्षाचे शुभेच्छा देण्यासाठी होती का? असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या जनतेला मुर्खात काढत आहात का? असा सवाल करत संतोष देशमुख यांना मारत असल्याचे अनेक व्हिडिओ पोलिसांना मिळाले आहेत. पोलीस ते व्हिडिओ जनतेसमोर का आणत नाहीत?संतोष देशमुख यांच्या हत्येची तपासणी करण्यासाठी एसआयटी नेमली त्यामध्ये वाल्मीक कराड सोबत संबंध असलेले अधिकारी आहेत.
बीड मधील लहान मुलांपासून सर्वांना माहिती आहे या प्रकरणातील आरोपी कोण आहेत. त्यामुळे या प्रकरणातील मारेकऱ्यांना शिक्षा देऊन दहशत मोडीत काढण्याचे पहिलं पाऊल उचलावं. याप्रकरणी अनेकांना धमकी आली आहे. मात्र मला धमकी देण्याचे धाडस कोण करत नाही. जर कोणी धमकी देण्याचे धाडस केलं तर पुढे बघू.शरद पवार यांनी या प्रकरणांमध्ये उचललेले पाऊल योग्य आहे.