
अंजली दमानियांचा पुराव्यांसह नवा गौप्यस्फोट
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडसह राज्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणातील खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलात जाण्याची चिन्हे आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता कागदपत्रे सादर करत वाल्मिक कराडच्या आर्थिक साम्राज्यावर हल्लाबोल केला आहे.
संतोष देशमुख यांचे हत्याकांड समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. जनतेतून संताप व्यक्त झाल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि 7 आरोपींना अटक झाली. तर, या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड हा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जातात. आता अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडवर थेट हल्लाबोल केला आहे.
अंजली दमानिया यांनी काय म्हटले?
अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पुरावे सादर केले आहे. बीडमधील एकूणच प्रशासकीय कारभारावरही प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले की, एक गोपनीय पत्र काल संध्याकाळी आले ज्याची माहिती मी मुख्यमंत्र्यांना दिली.
पत्रात लिहिले आहे की समाजसुधारक वाल्मिक कराड यांची केज, वडवनी, बीड आणि परळी येथे चार ते पाच वाइन ची दुकाने आहेत. प्रत्येक वाइन दुकानाचा बाजार भाव 5 कोटी इतका असल्याचे दमानिया यांनी सांगितले.
ही जमीन केज येथे 1,69,00,000 29/11/24 ला घेतली आणि 3 दिवसात परवानगी दिली गेली. सात बारा 15 दिवसानंतर होतो पण सगळे कायदे कसे धाब्यावर लावण्यात येतात याचे उदाहरण असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले.
वाल्मिक कराडकडे कोट्यवधींची मालमत्ता…
राज्यातील विविध शहरात कराडचे बँक खाती, वेगवेगळ्या शहरात मालमत्ता असल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केला. वाल्मिक कराडची तब्बल 100 बँक खाती असल्याचे सुरेश धस यांनी म्हटले आहे. वाल्मिक कराड याचे बँक खाते गोठवण्यात आले आहेत. वाल्मिक कराड याच्यासह फरार आरोपींची संपत्तीही जप्त करण्यात आली आहे.