
मराठा क्रांती मोर्चाने दिला सल्ला, काय घडलं?
बीड येथील मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी बीड, परभणी आणि पुणे येथे मोर्चे काढण्यात आले.
या मोर्चा दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांवर ओबीसी नेत्यांकडून आक्षेप घेण्यात आला होता. जरांगे यांच्या वक्तव्यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होत असल्याचा आरोप देखील ओबीसी नेत्यांकडून करण्यात आला. यानंतर आता ‘मराठा क्रांती मोर्चाकडून जरांगे यांनी वक्तव्य करताना काळजी घ्या’, असा सल्ला देण्यात आला आहे.
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कडक शासन व्हावे आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी राज्यभर मोर्चे काढण्यात येत आहेत. या मोर्चादरम्यान मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांना बेडा ठोकाव्यात आणि सुरेश धस यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी ओबीसी (OBC) नेत्यांकडून करण्यात आली आहे.
या मागणीनंतर आज मराठा क्रांती मोर्चा कडून पुण्यामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेमध्ये मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) कडून बीड मधील गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी सरकारने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी मराठी क्रांती मोर्चा कडून सरकार पुढे दहा मागण्या ठेवण्यात आल्या आहेत.
पत्रकार परिषदे दरम्यान जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी राजेंद्र कोंढरे म्हणाले, जरांगे पाटील त्यांच्या सहकाऱ्यांशी माझं कालच बोलणं झालं आहे. मात्र त्यांच्याशी माझा संपर्क होऊ शकला नाही. एखादी व्यक्ती जर चालून आली तर तिच्या पुरता तो संघर्ष मर्यादित आहे. तो संघर्ष दोन समाजामध्ये जाऊन नये अशी आमची भावना आहे. परंतु एखादी वाईट प्रवृत्ती एखादी भूमिका घेते दहशतवाद करते तलवारी काढते त्याच्यावर कोणी बोलणारच नाही आणि मग अशा प्रकारची भाषा आल्यावर त्याच्यावर वक्तव्य होणं हे देखील चुकीच आहे.
जरांगे पाटलांनी यामध्ये निश्चित काळजी घ्यावी असे आमचे या ठिकाणी आवाहन आहे. परंतु अपोजिट साईटने आज तुम्ही सोशल मीडिया बघा जिथे गुन्हेगारीचे उदात्तिकरण करणारे रील येत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने या रिल्सवर बंदी देखील घातली नाही. मग काय होतं की क्रियेला प्रतिक्रियेचे स्वरूप येतं. त्यातून समाजामध्ये विसंवाद वाढत जातात. ही परिस्थिती आजही आहे. आज ज्या ज्या ठिकाणी माहिती तंत्रज्ञान आहे. पोलीस यंत्रणा आहे. सायबरची विंग आहे. त्या त्या जिल्ह्यातील जे पेजेस आहेत त्यावर कारवाई केली पाहिजे. असे मराठा क्रांती मोर्चा पदाधिकारी राजेंद्र कोंढरे म्हणाले आहेत.