
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून रान उठवणारे भाजपचे आमदार सुरेश धस हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झाले.
सुरेश धस यांच्याकडून सातत्याने वाल्मिक कराडला लक्ष्य केले जात आहे. वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात असून राष्ट्रवादीचे नेते, मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणउघडकीस आल्यानंतर बीडसह राज्यात संतापाची लाट उसळली. अतिशय क्रूरपणे संतोष देशमुख यांना संपवण्यात आले. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटले. सुरेश धस यांच्याकडून मागील काही मोर्चांमध्ये धनंजय मुंडे लक्ष्य करण्यात येत होते. त्यानंतर धस यांनी आपल्या टीकेची तोफ उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे वळवली. पुण्यातील जनआक्रोश मोर्चात सुरेश धस यांनी अजित पवारांवर क्या हुआ तेरा वादा म्हणत निशाणा साधला होता. अजित पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती
सुरेश धस देवगिरीवर दाखल…
आमदार सुरेश धस हे अजित पवार यांना भेटण्यासाठी देवगिरी बंगल्यावर आज सकाळी पोहचले. मंगळवारी दुपारी देखील सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस वारंवार राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव घेत आहे. त्यावरून अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज सुरेश धस यांनी आज अजित पवारांची भेट घेतली.
मोठी घडामोड होणार?
सुरेश धस यांनी उपमु्ख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. मंगळवारी दुपारी, अजित पवारांच्या भेटीच्या वेळी सुरेश धस यांच्याकडे काही कागदपत्रे होती. त्यानंतर आज धस यांनी पु्न्हा एकदा पवारांची भेट घेतली. सुरेश धस यांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढणार की कमी होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.