
अंजली दमानियांनी पोस्ट केलेला फोटो सगळं सांगून गेला
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण तापले आहे. लक्ष्मण हाके यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना संतोष देशमुख प्रकरणात अडकवले जात असल्याचा आरोप या ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला.
दरम्यान या वक्तव्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड आणि लक्ष्मण हाके यांच्या संबंधावर एक सूचक ट्वीट केले आहे. दमानिया यांनी वाल्मिक कराड आणि लक्ष्मण हाके एकत्र जेवण करत असल्याचा फोटो ट्वीट केला आहे.
संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या बीड जिल्ह्यात मुक्काम ठोकून आहेत. भाजप आमदार सुरेश धसांविरोधात लक्ष्मण हाके मैदानात उतरले आहेत. वाल्मिक कराडला या प्रकरणात अडकवले जात असल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला. तसेच वाल्मिक अण्णा यांचे सर्वपक्षीय संबंध असल्याची बाब हाके यांनी अधोरेखित केली. वाल्मिक अण्णा यांचे शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील एवढेच काय सुरेश धस यांच्यासोबतही फोटो आहेत, असे लक्ष्मण हाके म्हणाले. त्यानंतर काही वेळातच अंजली दमानिया यांनी एक फोटो ट्वीट केला आहे.
अंजली दमानियांनी केला फोट ट्वीट
अंजली दमानिया यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. तो फोटो शेअर करताना हा फोटो एका व्यक्तीने मला पाठवला असे त्या म्हणाल्या. या फोटोमध्ये वाल्मिक कराड आणि लक्ष्मण हाके हे एकत्र जेवण करत आहे. हा फोटो नेमका कुठला आणि कधीचा आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. हा जुना फोटो आहे. अंजली दमानिया यांनी फोटो शेअर करताचा चर्चांना उधाण आले आहे.
अंजली दमानियांचे अनेक गौप्यस्फोट
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा गेल्या चार आठवड्यांपासून तपास चालू आहे. यासंदर्भात रोज वेगवेगळ्या गोष्टी बाहेर येत असून त्यात अनेक मोठमोठी नावंही चर्चेत आली आहेत. त्यात चर्चेतली दोन प्रमुख नावं म्हणजे वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा प्रमुख सहभाग होता असा दावा केला जात असून त्यासंदर्भात पोलीस सखोल तपास करत आहेत. पण दुसरीकडे वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचा वरदहस्त असल्याचाही आरोप होत असून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत.