
कराडला बीडला आणतानाचा Video Viral
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला एक महिना उलटून गेला आहे. या प्रकरणाशी संबंधित आणि आरोपींशी निगडित असलेल्या अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत असलेल्या वाल्मिक कराडबाबतही अनेक गौप्यस्फोट होत आहेत. त्याच्याशी निगडीत आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. वाल्मिक कराडला पुण्याहून केजला आणताना बीडमधील गुंडाचा थाट दिसला असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून पोलिसांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर बीडसह राज्यात एकच खळबळ उडाली. लोकांनी संताप व्यक्त केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीकडे सोपवण्यात आला. या हत्या प्रकरणाशी निगडीत असलेल्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करण्यात आली. सीआयडीने तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संशयित आरोपींच्या भोवती कारवाईचा फास आवळला. त्यानंतर वाल्मिक कराडने नाट्यमयरीत्या पुण्यात सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली. त्यानंतर मुख्यालयात पोलिसांनी वाल्मिक कराडची चौकशी केली. त्यानंतर पुण्याहून बीडमधील केज कोर्टात हजर करण्यात आले.
व्हायरल व्हिडीओत काय?
सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर पुण्याहून बीडमधील केजमध्ये आणण्यात आले. त्यावेळी पोलिसांचा मोठा ताफा होता. पोलिसांच्या याच ताफ्यासोबत बीडमध्ये गुन्हा दाखल असलेला गोट्या गीतेदेखील दिसून आला. गोट्या गीतेने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिडीओत पोलिसांच्या ताफ्याच्या मागे त्याची कार असल्याचे दिसते. तर, एका ठिकाणी हा गोट्या गीते काही पोलिसांची चर्चा करतानाही दिसला. या व्हिडीओला ‘सदैव दैवतसोबत आण्णा माझा विठ्ठल’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे.
गुन्हेगारी जगताचा बादशाह…
सोशल मीडियावरील आणखी एका व्हिडीओत गोट्या गीते याचा भाऊ आदित्य गीते याने गोट्याच्या समर्थनात एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओत गुन्हेगारी जगताचा तू बादशहा अशी कॅप्शन दिली आहे. या व्हिडीओत गोट्या गीते याला पोलीस घेऊन जाताना दिसत आहे.
संतापाची लाट…
गुन्हेगाराचे उदात्तीकरणाच्या व्हिडीओवर सोशल मीडियात संताप व्यक्त करण्यात येत आहे. बीडमधील स्थिती ही बिहारपेक्षाही वाईट असल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केली. तर, पोलिसांच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त करण्यात आली. संपूर्ण पोलीस खातेच पोखरलं गेल्याची प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.