
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या जीवाला धोका असल्याने त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सलमान राहत असलेल्या घराच्या बाल्कनीला नुकत्याच बुलेटप्रूफ काचा बसवण्यात आल्या आहे.
खरं तर बुलेटप्रूफ काच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फायदेशीर मानली जाते. बंदुकीची गोळी या काचेमुळे आरपार घुसत नाही. या काचेची किंमत नेमकी किती असते, तिचे फायदे काय ते सविस्तर जाणून घेऊ. .
अभिनेता सलमान खान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटची सुरक्षा आता वाढवण्यात आली आहे. त्याच्या घराच्या बाल्कनीला बुलेटप्रूफ काचा बसवण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती समोर येताच सोशल मीडियात बुलेटप्रूफ काचेविषयी जोरदार चर्चा सुरू झाली. ही काच किती सुरक्षित असते, तिची किंमत काय असे प्रश्न नेटकरी विचारत आहेत.
गोळी रोखण्याची क्षमता काचेत?
ही काच नावाप्रमाणेच बुलेटप्रूफ असते. बंदुकीची गोळी रोखण्याची क्षमता या काचेत असते. ही काच इतकी मजबूत असते, की बंदुकीची गोळी तिच्यातून आरपार जाऊ शकत नाही. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तिचा अनेक ठिकाणी वापर केला जातो. अनेक व्हीव्हीआयपी आणि उद्योगपती ही काच त्यांच्या घराबाहेर, ऑफिस, तसंच कारला बसवतात. यामुळे त्यांना सुरक्षा मिळते. साध्या काचेच्या तुलनेत बुलेटप्रूफ काच जास्त जाड आणि मजबूत असते. सुरक्षेसाठी ही काच सर्वोत्तम पर्याय मानली जाते. काच तयार करताना अनेक प्रकारचा कच्चा माल वापरला जातो. यात पॉलिकार्बेनेट,लॅमिनेटेड ग्लास आणि सॅफियरचा समावेश असतो. या काचेला एकापेक्षा जास्त थर असतात. त्यामुळे ही काच गोळीचा आघात झाला तरी फुटत नाही.
कोण लावू शकते ही काच?
बुलेटप्रूफ काचेला गोळी लागली तर ती काचेवरच थांबते. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर बुलेटप्रूफ काच सहजासहजी फुटत नाही. तसंच बंदुकीची गोळी तिच्यातून आरपार जात नाही. सैनिकांसह वेगवेगळ्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या बुलेटप्रूफचा दर्जादेखील वेगळा असतो. काही बुलेटप्रूफ काचांवर एकाच ठिकाणी वारंवार गोळी लागली तर ती फुटू शकते; मात्र अशा काही काचा दीर्घ काळ फुटत नाहीत.
काच लावण्यासाठी किती खर्च?
बुलेटप्रूफ काचेचा दर वेगवेगळा असतो. तिचा दर काचेचा प्रकार, जाडी आणि डिझाइनवर अवलंबून असतो. मिळालेल्या माहितीनुसार, घरात बुलेटप्रूफ काच लावण्यासाठी सुमारे 5000 ते 10,000 रुपये चौरस फूट या प्रमाणे येतो. जर काचेची जाडी आणि दर्जा अधिक चांगला असेल तर हा खर्च आणखी वाढू शकतो. आपल्या देशात सुरक्षेच्या कारणास्तव कोणीही बुलेटप्रूफ काच बसवू शकतं.