महाराष्ट्राचं कोडं सुटलं, सुरेश धसांनी दिला क्लू
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दररोज सुरेश धस यांच्याकडून या प्रकरणात नवे आरोप करण्यात येत आहेत, सुरेश धस यांनी या प्रकरणावर बोलताना आता बडी मुन्नीचा उल्लेख केला आहे.
मात्र ही बडी मुन्नी नेमकी कोण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही? या मुन्नी विषयी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार देखील चांगलेच संतापले. अखेर राष्ट्रवादीची मुन्नी कोण? यासंदर्भात स्वत: सुरेश धस यांनी क्लू दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी या संदर्भात खुलासे केले आहे.
मुन्नी कोण आहे? या प्रश्नावर बोलताना सुरेश धस म्हणाले, जी मुन्नी आहे तिला कळालेलं आहे. एकच आहे. सर्वात म्हणजे ती महिला भगिनी नाही… नाहीतर आणखी काहीतर राळ उठायची. मुन्नी जरी म्हटले असले तरी ती राष्ट्रवादीतील पुरुष मुन्नी आहे. त्या पुरुष मुन्नीला पक्का माहित आहे सुरेश धस माझ्याबद्दल बोलतोय. मुन्नीला माझी विनंती होती की, कच्चे बच्चे लोक बोलायला पाठवू नका. पाठवायचे असेल तर दुसऱ्यांना पाठवावे किंवा स्वत: मुन्नीने यावे. मुन्नी आल्याशिवाय मजा येणार आहे.
मुन्नी मला घाबरते : सुरेश धस
सुरेश धस म्हणाले, मुन्नीसोबत माझे चार- पाच फोटो असतील. मुन्नी बोलायला तयारच नाही. मी मुन्नी बोलण्याची वाट बघत आहे. मुन्नी बोलल्यावर मुन्नीचे कपडे टराटरा फाडील… फक्त मुन्नीने बोलावे. मुन्नी मला 100 टक्के घाबरते. मी मुन्नीविषयी बऱ्याच वेळा बोललोय. 2016-2017 साली मी बोललो आहे. मुन्नीचं माझ्यावर भरपूर प्रेम आहे. राष्ट्रवादीतून आम्हाला बाहेर काढायला मुन्नीचा मोठा हात आहे म्हणून मी त्याला मुन्नी म्हणतो.
मुन्नीचा उल्लेख कधी झाला?
सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची चहूबाजूंनी कोंडी केली आहे. धनंजय मुंडे राजीनामा देत नसल्याचे पाहून त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच क्या हुआ तेरा वादा असे विचारीत लक्ष्य केले.अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाण ही बालवाडीतील पोरं आहेत. यांना कशाला माझ्यावर बोलायला सांगता. राष्ट्रवादीतील बडी आणि बदनाम मुन्नीने समोर येऊन बोलावे मग मी बघतो, असे म्हणत मिटकरी आणि चव्हाण यांचा बोलविता धनी कुणीतरी वेगळाच आहे, हेच धस यांनी सूचित केले.
