
पंकाज मुंडे अन् धनंजय मुंडेंच नाव घेत धस यांचा जोरदार पलटवार
नागपुरला अधिवशेन चालू असताना संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं मला कळल. परंतु, याची दाहकता लक्षात यायला लागल्यावर मी लगेच नागपूर सोडून मस्साजोगला आलो.
त्यानंतर पोलीस, एसपी, डॉक्टर यांना भेटलो. त्यानंतर मला डॉक्टरांनी मला सांगितलं की हा खून काही साधा नाही. (Suresh Dhas) भयानक खून आहे. त्यानंतर मला एक एक कनेक्शन कळत गेल. मग हे कुणी केलं हे पाहिल्यानंतर याची तार कुठं आहे हे कळल. कारण ही सगळी लोक मुकादम किंवा असल्या कुठल्या कामातील आहेत. मग कुणाची टोळी आहे तर ही सर्व टोळी वाल्मिक कराड याची आहे हे लक्षात आलं असा थेट खुलासा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. ते लेट्सअप मराठी या वाहिनीवर लेट्सअप सभा या खास कार्यक्रमात बोलत होते.
ही घटना आता समोर आली. पण याच्या अगोदरही अशा घटना यांनी केलेल्या आहेत. यातील सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि यांची टोळी कुणाचा टॅक्टर चोरी, मुकादमकी करून कुणाला लुटायच असे अनेक काम यांनी केली आहेत. त्यामुळे या घटनेनंतर अनेक लोकांनी हे काय काम करतात ते मला आणून दाखवली. अनेकांकडे कॉल रेकार्डींगही मिळाल्या. त्यामध्ये ही लोक सांगत आहेत की आम्ही कसा ट्रॅक्टर चोरला, कसं कुणाला फसवलं त्यामुळे यांचा सगळा धंदा समोर आला असंही आमदार धस यावेळी म्हणाले. तसंच, त्यांनी यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावरूनही जोरदार पलटवार केला.
बीड आपल्यामुळं बदनाम झालं असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे असं विचारलं असता आमदार धस म्हणाले, त्या कसं बोलल्या मला माहिती नाही. परंतु, 12 डिसेंबरला मंत्री धनंजय मुंडे जे बोलले ते खूप चुकीचं बोलले आणि त्यानंतर स्वत: पंकजा मुंडेही चुकीचं बोलल्या आहेत. कारण, इतर जिल्ह्यातील आणि ही घटना खूप वेगळी आहे. देशातील भयानक घटना ही आहे. तरी तुम्ही म्हणता कुठही अशी घटना होते. तसंच, परळीत राखेच साम्राज्य, खंडणी मागणारे तिथंच, लोकांना जीवं मारणारे तीथच, पिस्तूल बाळगणारेही तीथच मग आमच्यामुळं कसं बीड बदनाम झालं म्हणता असा उलट सवालही त्यांनी यावेळी पंकजा मुंडे यांना केला आहे.
राजकारणातील माणसाला बूथ सांभाळण्यासाठी माणसं लागतात. इतकं सोप नाही बूथ सांभाळणारी माणसं मिळण. संतोष हा पंकजा मुंडे यांचाही बूथ प्रमुख राहिलेला आहे. तरी त्या म्हणतात अशा घटना इतर जिल्ह्यात होतात. त्यांच्या या वक्तव्यावर माझा आक्षेप आहे असंही आमदार धस यावेळी म्हणाले. बीडची बदनामी आमच्यामुळ नाही. बीडची बदनामी फक्त परळीमुळं झालेली आहे. खंडणी परळी, खून परळी, राख परळी, वाळू परळी, पिकवीमा घोटाळा परळी, असं सांगत ही बदनामी फक्त परळीमुळं झाली आहे असं म्हणत पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर थेट घणाघात आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
मी ओबीसी आणि मराठा असा वाद कधीच केला नाही. परंतु, एक सांगायचं म्हणजे माझ्या विरोधात माजी आमदार भिमराव धोंडे यांना पंकजा मुंडे यांनी उभ केलं. ते ओबीसी आहेत. त्यांनी त्यांचं कामही केलं. परंतु, ज्या ठिकाणी ओबीसी मत जास्त आहेत तीथं जास्त मतं मला झाली आहेत असं म्हणत त्यांनी ओबसी मराठा वाद लावल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. त्याचबरोबर स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या मी विरोधात असतानाही 35 टक्के वंजारी मत मला पडले आहेत असा दावा करत त्यांनी या मुंडे भाऊ-भगिनींनी जरा पाहायला पाहिजे असा टोलाही लगावला. तसंच, लोकसभेला मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी समाज अंगावर घेऊन पंकजा मुंडे यांचं काम केलं. मात्र, त्यांनी विधानसभेला माझ्या विरोधात काम केलं असा थेट पुन्हा आरोप केला.