
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करण्याची मागणी पुढे येत आहे. यासाठी शिंदे गटातील नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत.
इतकेच नाही तर स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करा अशी मागणी करणारा ठराव सोमवारी मंजूर करण्यात आला. आता शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन ही मागणी करणार आहेत, अशी माहिती माजी मंत्री रामदास कदम यांनी दिली.
मुंबईतील वांद्रे परिसरातील रंगशारदा सभागृहात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी बीकेसीत महत्वाची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य सत्कार करण्याचे नियोजन आहे. याच बैठकीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात चर्चा होणार आहे.
शिंदेसेनेचा ठराव अन् फडणवीसांची कोंडी
सन 2014 मध्ये राज्यात युतीचं सरकार आल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. तसा शासन आदेशही प्रसिद्ध करण्यात आला होता. पुढे सप्टेंबर 2016 मध्ये स्मारकासाठी विश्वस्त मंडळास सरकारने मान्यता दिली. स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा करण्यात आली. सुभाष देसाई सचिव तर आदित्य ठाकरे सदस्य म्हणून या समितीत होते. भाजप नेत्या पूनम महाजन आणि आर्किटेक्ट शशिकांत प्रभू यांचाही या समितीत सदस्य म्हणून समावेश करण्यात आला. पाच वर्षांसाठी या नियुक्त्या होत्या. या नियुक्त्या देवेंद्र फडणवीस यांच्याच कार्यकाळात झाल्या होत्या. त्यामुळे आता शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या हकालपट्टीची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
काय म्हणाले रामदास कदम
मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाला विनंती करणार आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी झाली पाहिजे. त्या स्मारकाचा आणि उद्धव ठाकरेंच्या काही संबंध राहता कामा नये. जर उद्धव ठाकरे स्मारकामध्ये गेले तर वरून शिवसेनाप्रमुखांना वेदना होईल की ज्याने माझ्या विचारांशी गद्दारी केली तो माझा मुलगा माझ्या स्मारकामध्ये कसा येऊ शकतो? असं रामदास कदम म्हणाले.