
कराडची बायको संतापली, सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप
वाल्मिक कराड याच्यावर मकोका आणि हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवून एसआयटीने कारवाईचा फास अधिक घट्ट केला. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली असताना देशमुख हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभाग आणि विशेष चौकशी पथकाने चौकशीसाठी ताबा मागितला.
या सगळ्या घडामोडी केजमध्ये घडत असताना परळीत कराडवरील कारवाईचे पडसाद उमटले. वाल्मिक कराड याच्या कुटुंबियांनी आणि समर्थकांनी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या मांडला. मंगळवारी सायंकाळी वाल्मिक कराड याच्या पत्नीने पत्रकार परिषद घेऊन भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप करून तपास यंत्रणांवर संशय व्यक्त केला.
कॉल डिटेल्स रेकॉर्ड अर्थात सीडीआर काढायची एवढीच हौस आहे तर सुरेश धस यांचेही सीडीआर काढा म्हणजे त्यांचेही प्रताप समोर येतील. त्यांनी एसआयटीला किती फोन केले आणि एसआयटीमधील अधिकाऱ्यांनी धस यांना किती फोन केले, हे समोर येईल, अशी आक्रमक मागणी करून धस यांच्या सांगण्यावरूनच कारवाई होत असल्याचा आरोप कराड याच्या पत्नीने केला.
संतोष देशमुखची आणि माझ्या नवऱ्याची ओळखही नाही, त्यांचा साधा फोनही झाला नाही
वंजारी समाज हा छोटा समाज आहे. आमच्या आजूबाजूला मराठा समाज आहे. त्यामुळे वंजारी समाजाला कसे दाबायचे, त्याला वरती येऊ द्यायचे नाही, असे षडयंत्र रचले गेले आहे. माझ्या नवऱ्याला अडकविण्यासाठी पूर्णपणे रणनीती आखली आहे. ज्याचा खून झाला त्याचा आणि माझ्या नवऱ्याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. त्यांची साधी ओळख नाही, त्यांचा फोन नाही, ते परळीच्या बाहेर गेले नाहीत, केजमध्ये ते कशाला गेलेत? यावरून राजकारण किती खालच्या पातळीला गेले आहे, हे लक्षात येईल, असे कराडची पत्नी म्हणाली. तसेच एसआयटीतील काही अधिकारी सुरेश धस यांच्या सांगण्यावरून काम करीत असल्याचे म्हणत संबंधित अधिकाऱ्यांना एसआयटीतून बाहेर काढण्याची मागणी त्यांनी केली.
वंजारी समाजाचे दोन नेते मंत्री झाल्याचे सुरेश धस यांना खुपतंय
सुरेश धस यांच्या सांगण्यावरून हे सगळे केले जातेय. सुरेश धस यांना दोन नेत्यांना संपवायचे आहेत. वंजारी समाजाचे दोन नेते मंत्री झाल्याचे त्यांना खुपत आहे.हे सीएमसाहेबांनी ओळखून घ्यावे. मी त्यांनाच न्याय मागेन, ते याप्रकरणात लक्ष घालतील. कारण माझ्या नवऱ्याने प्रामाणिकपणे महायुतीचे काम केले. त्यांना आता न्याय देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री महोदयांची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायाचा शब्द आम्हाला द्यावा आणि बीडचे पोलीस अधीक्षक यांनी आमचे निवेदन स्वीकारावे, असे कराडची पत्नी म्हणाली.
कराडचे कुटुंबीय आक्रमक, पोलीस स्टेशनसमोर ठिय्या, आंदोलन मागे घेण्यास नकार
परळी येथील पोलिस ठाण्यासमोर सुरू असलेल्या वाल्मीक कराड यांच्या समर्थक आणि कुटुंबीयांच्या आंदोलनामध्ये, काही वेळापूर्वी अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी भेट दिली आहे. यावेळी वाल्मीक कराड यांच्या आईची त्यांनी चर्चा केली. हे आंदोलन मागे घेण्यासाठी सकाळपासून दोन ते तीन वेळा पोलीस अधिकाऱ्यांनी कराड यांच्या आईशी बोलणं केला आहे. परंतु आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम असून आंदोलन मागे न घेण्याचा इशारा दिला आहे. सकाळपासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान वाल्मीक कराड यांच्या आईची प्रकृती देखील बिघडली होती. त्यानंतर डॉक्टरांनी देखील त्यांची या ठिकाणी तपासणी केली आहे. परंतु तरी देखील त्या आंदोलनातून माघार घ्यायला तयार नाहीत.