
राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडच्या कुटुंबियाची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. आज पहाटे ही भेट झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक कराडला राजकीय पाठबळ असून धनंजय मुंडे यांचा तो निकटवर्तीय असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. आता, धनंजय मुंडे यांनी कराड कुटुंबाची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी वाल्मिक कराडची रवानगी बीडच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. तर, दुसरीकडे कराडच्या समर्थकांनी आज परळीत बंदची हाक दिली आहे. मंगळवारी परळीत कराडच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर आज परळीत तणावपूर्ण शांतता आहे. वाल्मिक कराडला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे
धनंजय मुंडे यांनी घेतली कराड कुटुंबीयांची भेट…
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी पहाटे कराड कुटुंबाची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईवरून परळी मध्ये आल्यानंतर धनंजय मुंडे हे कराड कुटुंबीयांच्या घरी दाखल झाले. मुंडे यांनी वाल्मिक कराड यांच्या आई आणि पत्नीची विचारपूस केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळली आहे. या भेटीला अधिकृत दुजोरा मिळत नसला तरी भेट घेतल्याची परळीमध्ये चर्चा आहे. काल आंदोलनादरम्यान वाल्मिक कराड याच्या आई पारूबाई यांना भोवळ आली होती. तब्बल दहा तासापेक्षा जास्त कराड कुटुंब पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलनात बसून होते.
परळीत तणावपूर्ण शांतता…
परळीमध्ये आज तणावपूर्ण शांतता असून सर्वत्र बंद पाळण्यात आला आहे. परळी शहरातील मुख्य बाजारातील दुकाने बंद असून तुरळक वाहने वगळता शुकशुकाट दिसून येत आहे. राज्याचे मंत्री आणि स्थानिक आमदार धनंजय मुंडे हे देखील परळीत दाखल झाले आहेत. धनंजय मुंडे आज आपल्या समर्थकांना शांततेचे आवाहन करण्याची शक्यता आहे. मंगळवारी, सकाळपासून कराड समर्थकांनी आंदोलनास सुरुवात केली होती. वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड यांनीदेखील महिलांसह परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. कराडला मकोका लावल्याचे समोर येताच समर्थक अधिकच आक्रमक झाले होते. काही ठिकाणी टायर जाळण्यात आले. तर, एका समर्थकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.