
१८०७ साली बांधलेला हा राजवाडा पेशवे राजवटीचे शेवटचे शासक बाजीराव दुसरे यांचे निवासस्थान होता. आता या वाड्यात एक संग्रहालय, ग्रंथालय, पोस्ट ऑफिस आणि स्थानिक हस्तकला दुकान आहे.
सदाशिव पेठेत असलेला विश्रामबाग वाडा हा २०० वर्षे जुना असलेला पारंपारिक वाडा आहे.
या वाड्याचं बांधकाम पूर्ण होण्यासाठी सहा वर्षे लागली आणि अंदाजे २ लाख रुपये एवढा खर्च आला होता. मराठा साम्राज्याचे शेवटचे पेशवे बाजीराव दुसरे हे १७ व्या शतकाच्या सुरुवातीला या वाड्यात सुमारे ११ वर्षांपर्यंत राहिले होते. या वाड्यात एकेकाळी एक सुंदर बाग होती आणि या वाड्याचं नाव माळी विश्राम यांच्या नावावरून विश्रामबाग असं ठेवण्यात आलं आहे. (vishrambaug wada)
२०,००० चौरस फूट क्षेत्रफळ असलेला हा वाडा तीन मजली उंच आहे. हा वाडा त्यावर असलेल्या कोरीव कामासाठी ओळखला जातो. या वाड्याचे मुख्य वास्तुविशारद मन्साराम लक्ष्मण आणि दाजी सुतार हे होते. वाड्याची वास्तुकला पेशवे शैलीनुसार घडवली आहे. हा वाडा प्रामुख्याने लाकडापासून बनवलेला आहे. सरूच्या आकाराच्या स्तंभांनी सजवलेला आहे.
इथल्या प्रत्येक स्तंभाची बांधणी एकाच सागाच्या झाडापासून केलेली आहे. याव्यतिरिक्त या वाड्यात दगडी फरशी, सागाने तयार केलेली गॅलरी आणि बाल्कनी तसंच टेराकोटाचा दर्शनी भाग आहे. वाड्याच्या पहिल्या मजल्यावर दरबार आहे. दरबार हॉलला लाकडी बाल्कनी जोडलेली आहे. हॉल पर्यटकांसाठी खुला नाही. कारण ही रचना अस्थिर झाली आहे. म्हणून इथे फिरणं असुरक्षित आहे. या वाड्यात मस्तानी महल देखील आहे.
या वाड्याचा वापर अनेक कारणांसाठी केला जायचा. संस्कृत शिकवण्यासाठी आणि कालांतराने शेती आणि अभियांत्रिकी सारख्या इतर विषयांसाठीही याचा वापर शैक्षणिक संस्था म्हणून केला जात होता. डेक्कनचे तत्कालीन आयुक्त विल्यम चॅप्लिन यांच्या काळामध्ये सरकारने दक्षिणा निधीतून २०,००० रुपये बाजूला ठेवले. हा उपक्रम मराठा सरदार खंडेराव दाभाडे यांनी सुरू केला होता.
१८२१ साली या विश्रामबाग वाड्यात हिंदू कॉलेज होतं. हे कॉलेज म्हणजे पहिली ब्रिटिश प्रायोजित शैक्षणिक संस्था होती. १८५१ साली त्याचं नाव पूना कॉलेज असं ठेवण्यात आलं. आज हे डेक्कन कॉलेज म्हणून ओळखलं जातं. भारतातल्या ब्रिटिश राजवटीत, या वाड्याचा वापर तुरुंग म्हणूनही केला जात असे. (vishrambaug wada)
पुढे १९३० साली पुणे महानगरपालिकेने ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून १,००,००० रुपयांना हा वाडा विकत घेतला. पीएमसीने या वाड्याला ग्रेड १ वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे.
सध्या या वाड्याचा एक भाग जनतेसाठी खुला आहे आणि उर्वरित भाग पीएमसीच्या जन्म आणि मृत्यु नोंदणी कार्यालयासारख्या सरकारी कार्यालयांसाठी वापरला जातो. तर दुसरा भाग पोस्ट ऑफिस म्हणून वापरला जातो. या परिसरात सावित्री मार्केटिंग इन्स्टिट्यूशन फॉर लेडीज एम्पॉवरमेंटद्वारे चालवले जाणारे एक हस्तकलेच्या वस्तूंचे दुकान देखील आहे. (vishrambaug wada)
एसएमआयएल ही स्फुर्ती महिला मंडळ आणि पीएमसीच्या नागरी समुदाय विकास विभागाने वंचित महिला आणि शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग लोकांद्वारे बनवलेल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी स्थापन केलेली एकछत्री संस्था आहे.