
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, यानंतर आता वाल्मिकला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात नाव आल्यानंतर वाल्मिक कराडच्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातल्या संपत्ती समोर येत आहेत. मागच्या काही दिवसांमध्ये वाल्मिक कराडच्या गडगंज संपत्तीचे एक एक खजाने उघड होताना दिसत आहेत.
हायप्रोफाईल सोसायटीमध्ये फ्लॅट
पुण्याच्या पिंपरी चिंचवड शहरात कराडच्या नावावर असलेल्या साडेतीन कोटींच्या आलिशान फ्लॅटची माहिती समोर आली होती, त्यानंतर आता पिंपरी-चिंचवड शहरातच वाल्मिक कराडच्या पत्नीच्या नावाने सुमारे एक कोटी रुपये किंमतीचा फ्लॅट असल्याची बाब उघडकीस आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील अत्यंत उच्चभ्रू परिसरात असलेल्या मी कासा बेला या सोसायटीच्या ए विंगच्या चौथ्या मजल्यावर वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराड हिच्या नावावर फ्लॅट असल्याचं दिसतंय. एवढच नाही तर या फ्लॅटचा करही थकवला गेल्याची माहिती समोर येत आहे.
कराडच्या संपत्तीवर धस यांचे आरोप
पुण्यातील सगळ्यात हायप्रोफाईल समजल्या जाणाऱ्या मगरपट्टा सिटी आणि एफसी रोड भागात वाल्मिक कराडची 115 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. एफसी रोडवर आकाने 7 दुकानं विकत घेतली आहेत, त्यात 4 दुकानं स्वत:च्या आणि 3 दुकानं दुसऱ्या पत्नीच्या नावाने असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता.
मगरपट्ट्यामध्ये वाल्मिक कराडने ड्रायव्हरच्या नावावर संपूर्ण फ्लोअर बुक केला आहे. अॅमनोरा पार्क, मगरपट्टा सिटी इथे एका फ्लॅटची किंमत 15कोटी रुपये आहे. 15 कोटीला एक फ्लॅट असताना तिथे वाल्मिक कराडच्या ड्रायव्हरच्या नावावर इमारतीचा एक अख्खा फ्लोअरच आहे. फ्लोअरची किंमत 75 कोटी आहे आणि हा संपू्र्ण फ्लोअरच आकांनी चालकाच्या नावावर केला आहे, असा दावा सुरेश धस यांनी केला आहे.