
मला दर महिन्याला बोलवत जा!
राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आज बारामतीत आहेत. कृषी विज्ञान केंद्रामध्ये आयोजित कृषिक या कृषी प्रदर्शनाला त्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाची त्यांना चांगलीच भुरळ पडली.
त्यानंतर भाषणादरम्यान त्यांनी हे बोलून दाखवताना आपल्याला बारामतीला दर महिन्याला बोलवावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
अॅग्रिकल्चिर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित उद्घाटन कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार, ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, ट्रस्टचे विश्वस्त व सकाळ माध्यम समुहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना मुंडे म्हणाल्या, बारामतीत पवार पॅक्ड कार्यक्रमात सॉरी पॉवर पॅक्ड कार्यक्रमात मलाही वेगळं वाटतंय. कारण माझ्या जीवनात मला कधीही बारामतीच्या या मंचावर कार्यक्रम घेईन, असे वाटले नव्हते. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार. त्यांनी मला हे खातं दिलं आहे. त्या खात्यासाठी अजितदादांच्या खूप संकल्पना आहेत. त्यानिमित्ताने आम्हाला हे सगळं बघता आलं.
2015 मध्ये विलासराव देशमुख यांच्या स्मारकाचे लोकार्पण करायचे होते. त्यावेळी मी लातूरची पालकमंत्री होते. शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन होते. त्यावेळी भाषण करताना माझे पाय लटपटत होते. ऊसतोड कामगारांच्या आंदोलनातही पवारसाहेबांचे खूप मार्गदर्शन मिळाले. साखर संघाची संचालक होते. नंतर अनेक मंचावर एकत्र येण्याचा योग आला. अजितदादांबरोबर कधी योग आला नाही. पण आज अजितदादांबरोबर काम करतेय, असे मुंडे यांनी सांगितले.
माझ्या जीवनातील सकाळ कधीच एवढी योग्य कामासाठी केली नाही. तीन-चार कप चहा पिण्यात गेली. डोकं खराब करणाऱ्या बातम्या ऐकण्यात गेली. आधी अजितदादांनी त्यांनी मला सकाळी 7.45 ला भेटण्यास सांगितले. मला यायला 7.31 झाले. पण दादा आधीच गाडीत बसले होते. मी धावत जाऊन गाडीत बसले. बारामतीत मला जरा दर महिन्याला बोलवत जा. इथला प्रोफेशनलिझम मला शिकता येईल, असे मुंडे म्हणाल्या.
मला खूप काही उपयोग होईल. कारण मी दुष्काळी भागात जन्मले, वाढलेय. तिथले लोकं स्थलांतरित झाले असतात. त्यांना एवढ्या सुविधा नसतात. अशावेळी काम करताना या गोष्टी कशा करू शकतो, ही एक तळमळ मनात आहे. मला इथे खूप शिकायला मिळाले. बारामतीच फक्त बारामती असू नये. बारामतीचे रेप्लिकेशन राज्यातील प्रत्येक तालुका, जिल्ह्यात व्हावे, यासाठी पिढी घडवण्याचे काम व्हावे, अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.