
कधीकाळी आलिशान कारमधून फिरायचा कराड, आता पोलिस व्हॅनमधून ‘फेऱ्या’
पालकमंत्रिपदाचे कार्यकारी अधिकार वाल्मीक कराडकडेच आणि पालकमंत्रिपद, कृषिमंत्रिपद भाड्याने होते, या प्रकाश सोळंके व सुरेश धसांच्या आरोपांना कागदोपत्री आधार नसला, तरी कराडच्या शब्दाबाहेर जाण्याची कोणत्याच विभागातील आणि कोणत्याच हुद्द्यावरील अधिकाऱ्यांची बिशाद नव्हती, हे चित्र अगदी नऊ डिसेंबरच्या सायंकाळपर्यंतचे!
एवढेच काय, तर त्याला अटक होण्यासाठी चक्क विनवणी करत बड्या अधिकाऱ्यांना १२ डिसेंबरला परळीला जावे लागले!
महिनाभरात एवढे चित्र पालटले, की एंडेव्हर, फॉर्च्युनर, लॅंड क्रूजर, डिफेंडर अशा ५० लाखांपासून अडीच कोटींच्या वाहनांत फिरणाऱ्या वाल्मीक कराडला पोलिस व्हॅनमध्ये बीड-केज अशा फेऱ्या माराव्या लागत आहेत.’आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी’ या म्हणीचा प्रत्यय यानिमित्ताने येत आहे.
ता. सहा डिसेंबरला कराडचे पंटर असलेले सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, प्रतीक घुले यांनी मस्साजोगच्या आवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पावर जाऊन भांडण केले. वॉचमन सोनवणेंच्या फिर्यादीनुसार ॲट्रॉसिटी दाखल झाली असती, तर ना संतोष देशमुखांचा खुन झाला असता, ना वाल्मीक कराडचे कारनामे पुढे आले असते! सुरवातीला किरकोळ गुन्हा नोंदविला गेला आणि अधिकारीच या आरोपींसोबत चहा-पान करत फिरू लागले. आता त्या अधिकाऱ्यांनी कोणाच्या शब्दाखातर ते गुन्हे दाखल करून घेतले नाहीत, हा वेगळा विषय असला तरी ते गुन्हे पुन्हा नोंद झाले आणि तेथूनच ‘गॅंग्स ऑफ परळी’ची देशभर चर्चा व्हायला लागली.
सलाम अण्णा!
गोपीनाथ मुंडे यांच्या घरी काम ते जिल्ह्यावर हुकुमत असलेला वाल्मीक कराड सर्वांनाच ठाऊक आहे. त्याची कोणामुळे इथपर्यंत मजल गेली आणि या ‘प्रवासा’चे साथीदार कोण, या विषयावर आता सामान्य नागरिकांमध्येच नव्हे, तर पोलिस दलातही चर्चा सुरू आहे. खंडणी, मकोका या गुन्ह्यांसह संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा सीआयडीचा दावा या अलीकडच्या घटना असल्या तरी या पहिल्याच नाहीत. यापूर्वीही शस्त्र अधिनियम, ठार मारण्याचा प्रयत्न, जमीन हडपण्याचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांची भलीमोठी यादी जिल्ह्याच्या पोलिस दलाच्या दफ्तरात नोंद आहे.
पण, त्याला कधी अटक झाली, कोठडी मिळाली अशी चर्चा कधी झालीच नाही. बहुतांशी बाबी कागदोपत्रीच झाल्या. अगदी काही महिन्यांपूर्वी ठार मारण्याच्या प्रयत्नाखाली त्याच्यावर ताजा गुन्हा नोंद आहे. तरीही त्याला दोन पोलिस कर्मचारी अंगरक्षक होते. अगदी खंडणीचा गुन्हा आणि फरार होण्याच्या काही काळातही त्याच्याकडे अंगरक्षकांची नोंद आहे. यावरून त्याचा पोलिस दलातील त्याचा दबदबा काय होता, ते सहज लक्षात येते.
याच दलात तो सांगेन तीच पूर्वदिशा सिद्ध करण्यासाठी खांडेची अटक आणि महिनाभरात बांगर कुटुंबीयांवर दाखल गुन्ह्यांची शृंखला अशी उदाहरणे भरपूर आहेत. कोणाला शस्त्र परवाना किंवा वाइन शॉपचा परवाना हवा असेल तर कागदपत्रे गोळा करता करता नाकी नऊ येतील. एखादा किरकोळ गुन्हा असेल तर फाइल फेकली जाईल. पण, गुन्ह्यांची भलीमोठी यादी असतानाही वाल्मीक कराडला वाइन शॉप आणि शस्त्र परवानेही सहज मिळाले.
वाल्मीक कराड बीडला येणार, अशी चर्चा झाली तरी प्रशासन टाइट असे. तो कामासाठी एखाद्या कार्यालयातच येईल, असेही नाही. रेस्ट हाऊसला येऊन बसला तरी सलाम ठोकण्यासाठी अधिकाऱ्यांची रांग हे सामान्य बीडकरांनी दोन महिन्यांपूर्वी पाहिलेले चित्र. पण, दोन दिवसांपासून दिसत असलेले चित्र पाहिले तर ‘कहां तसे कहां तक’ म्हणावे लागेल. ता. ११ तारखेला गुन्हा नोंद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला अटकेची विनंती करण्यासाठी बड्या अधिकाऱ्यांना परळी गाठावी लागली.
दिवसांपासून दिसत असलेले चित्र पाहिले तर ‘कहां तसे कहां तक’ म्हणावे लागेल. ता. ११ तारखेला गुन्हा नोंद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला अटकेची विनंती करण्यासाठी बड्या अधिकाऱ्यांना परळी गाठावी लागली.
नंतरही परिस्थिती बदलली, पण त्याला अटक करण्याची कुणाची बिशाद झाली नाही, असेच म्हणावे लागेल. कारण, त्याच्या समर्थकांना कळते तो शरण येणार आणि यंत्रणेला नाही असे होणार नाही. त्याला अटक करणार तरी कोण? कारण महत्त्वाच्या ठिकाणी बसलेले बहुतांशी त्याच्या मर्जीमुळेच. दरम्यान, शरण येतानाही त्याच्याकडे आलिशान स्कॉर्पिओ होतीच.
दरम्यान, ३१ रोजी शरणागतीनंतर पुण्याहून त्याला पोलिस जीपने आणले. पण, अगोदर न्यायालयीन कोठडीत पाठविल्यानंतर पोलिस व्हॅनमधून त्याचा प्रवास सुरू झाला. बुधवारी तर बीड-केज-बीड अशी मोठी फेरी मारावी लागली. त्याच्या सिमरी पारगाव, मांजरसुंबा, डिघोळ अशा ठिकाणी शेकडो एकर जमिनी आणि पुण्यातील आलिशान फ्लॅटचे किस्से आता समोर येत आहेत. माध्यमे आता दाखवत असली तरी सामान्यांना हे पूर्वीपासून माहीत आहे. लोकसभा निवडणुकीत प्रत्येक बॅनरवर दिवंगत गोपीनाथ मुंडे, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या बरोबरीने वाल्मीक कराडचा फोटो तेवढ्याच आकारात लागत होता हेही विशेष!