
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
तसेच आपली ही मागणी मान्य झाली नाही तर राज्य बंद असं समजयाचं, असा मोठा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना दिला आहे. “आम्ही न्यायाच्या बाजूने आहोत, या राज्यात आज चित्र-विचित्र बघण्याची वेळ आली आहे. वाईट चित्र पाहण्याची वेळ मंत्री धनंजय मुंडेंच्या टोळीने आणली आहे. लोक आता सोडून द्या म्हणून आरोपीच्या बाजूने उभे राहणार. त्यांनी पाप झाकण्यासाठी वाईट वळण लावलं आहे. खंडणी आणि हत्येतील आरोपी एकच आहेत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे यांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर
मनोज जरांगे यांना यावेळी भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्याचा काय संबंध आहे याच्याशी, अभ्यास कमी आहे तर माझ्या वाटचा तू कर म्हणावं. त्यालाच माहीत त्याला विचारून घ्या. कशाची जळजळ आहे? मराठ्यांची पोरं मारून टाकायची आहेत का? जळफळाट कशाचा झाला? काय नाही. दादांबद्दल ( नारायण राणे) आमच्या मनात पहिल्यापासून आदर आहे. राणे साहेबांना आम्ही मानतो, शक्यतो आम्ही त्यांना उत्तर देत नाही. हे चिल्लर, आम्ही त्यांना मोजत नाहीत. तूच अभ्यास कर आणि तू तुझं बघ म्हणावं काही, आमचा अभ्यास आम्ही बघतो. त्याचे ते बघून घेईल. त्याला याच्यात पडायची काही गरज नाही. एका लेकराचा खून झाला. याच्यात कशाला खाजवतो? म्हणा तिकडे गपचूप पड, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी नितेश राणे यांना प्रत्युत्तर दिलं.
बीडच्या पालकमंत्रीपदी अजित पवार, मनोज जरांगे काय म्हणाले?
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार यांची वर्णी लागली आहे. “आता गुन्हेगारीचा सफाया होईल असं वाटतंय. एकही आरोपी सुटणार नाही. कारण मुख्यमंत्र्यांनी तसा शब्द दिला आहे. खून करणाऱ्या पेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यापेक्षा खून करणार खूप मोठा असतो. एक आरोपी सापडला नाही. मात्र ही मोठी साखळी आहे. मुख्यमंत्री सगळ्यांना घेतील, नाहीतर राज्य बंद समजायचं”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
तपास यंत्रणा सध्या चांगलं काम करत आहे. एक आरोपी सुटला तर राज्यभर आम्ही आंदोलनाच्या पावित्र्यात येणार आहोत. सध्या तरी मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर मराठे शांत आहेत. सध्या तरी सरकार गांभीर्याने घेतंय, पुढे पुढे बघू, असं मनोज जरांगे म्हणाले.