
सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; काय आहे नेमकं प्रकरण?
सरंपच संतोष देशमुख हत्याप्रकरण आमदार सुरेश धस यांनी लावून धरले. या प्रकरणामुळे ते चर्चेत आले. अशात त्यांनी गैरप्रकार केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी बाहेर काढली.
त्यांनी धस यांच्या विरोधात याचिका देखील दाखल केली. त्यानंतर राम खाडे यांना पोलीस संरक्षण देण्यात आले. दरम्यान खाडे यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता पोलीस संरक्षण काढण्यात आले असल्याचे सांगितले आहे.
राम खाडे यांचे पोलीस संरक्षण काढून घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझ्या जीवितास आमदार सुरेश धस, पत्नी प्राजक्ता धस, देविदास धस यांच्यासह अनेकांकडून धाेका आहे. त्यामुळे पोलीस संरक्षण पूर्ववत करण्यात यावे’ असे राम खाडे यांनी म्हटले आहे. याप्रकरणी त्यानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनदेखील केले आहे.
निवेदनामध्ये त्यांनी ‘आमदार सुरेश धस यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची कार्यवाही उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाई न केल्याने राजकीय हस्तक्षेप होत आहे. यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी व दहशत माजवण्यासाठी निर्घृण हत्येसारख्या घटना घडवल्या जात आहेत’, असे म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले, देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात सुरेश धस हे मुख्य आरोपी आहेत. त्यांनी माध्यमांमध्ये स्वत:ला निर्दोष घोषित करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या २० वर्षांत धस यांनी कोणताही मोठा विकास प्रकल्प राबवलेला नाही, उलट शासकीय व इनाम जमिनींचा गैरवापर करून सार्वजनिक निधीची लूट केली आहे.’
निवेदनात सामजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलीस संरक्षण पुन्हा देण्याची विनंती केली आहे. यापूर्वीही त्यांच्या घरावर हल्ला झाला होता. राजकीय हेतूसाठी सुरक्षा कमी करण्यात आल्याचा आरोप खाडे यांनी केला आहे.