
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात दुसऱ्यांदा फूट पडण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. यातच विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना जर पदावरून बाजूला केले तर त्यांची भूमिका काय राहणार.
हा देखील चिंतेचा विषय बनू शकतो.
विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पहिल्यांदाच शरद पवार(Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत पक्षसंघटनेची नव्याने बांधणी करणे, महाविकास आघाडीतील घडामोडी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा अपेक्षित होती. मात्र प्रत्यक्षात चर्चा झाली ती पक्षाच्या सात खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्यासाठी दिलेल्या ‘ऑफर’ची. अर्थात या आरोपानंतर जाणाऱ्यांनी आणि घेणाऱ्यांनी या चर्चेपासून हात झटकणे स्वाभाविक होते आणि झालेही तसेच. मात्र एकूणच या संदर्भातील चर्चेचा सूर व केंद्रातील राजकारणाची दिशा पाहता असे काही होणार नाही, हे म्हणणे धाडसाचे ठरेल. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये दुसऱ्यांदा फूट पडण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.
आणखी एकदा फुटीचा प्रयत्न –
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीचे आणि सत्ताधारी अजित पवारांच्या(Ajit Pawar) राष्ट्रवादीत उत्साहाचे वातावरण आहे. चर्चेपासून हात झटकले. भाजपसोबत सत्तेत जाण्यासाठी अजित पवार यांनी स्वतंत्र भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली. या फुटीमुळे पक्षसंघटना पूर्णपणे खिळखिळी झाली. मात्र तेवढ्यावर समाधान झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे शरद पवार यांची उरलीसुरली राष्ट्रवादी गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुनील तटकरे यांच्या माध्यमातून केंद्रात मंत्रिपद हवे असल्यास त्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील सात खासदारांना सोबत घेण्याची ‘अट’ घातल्याची चर्चा आहे. या चर्चेपासून मात्र दोन्ही बाजूच्या नेत्यांनी हात झटकले आहेत.
मात्र दुसरीकडे अजित पवार किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या नसल्याचे कोणीही नाकारलेले नाही. येणाऱ्या खासदारांचा योग्य तो ‘मान-सन्मान’ ठेवण्याचीही चर्चाही या बैठकीत झाल्याचे बोलले जात आहे. याच बैठकांचा ‘गंध’ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापर्यंत पोहोचल्याने त्यांनी देखील संबंधित खासदारांना बैठकीतच ‘आहेर’ दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांच्या बैठका झाल्या होत्या, यावर मात्र शिक्कामोर्तब करण्यास मोठा वाव आहे.
शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार व आमदार या सर्वांसमोरच पुढील पाच वर्षांच्या राजकीय वाटचालीचा पेच निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीही(MVA) टिकण्याची शक्यता नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा देत ‘एकला चलो’चा नारा दिला आहे. काँग्रेसची अवस्था तर दिशाहीन आणि नेतृत्वहीन झाली आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढू शकते का?
फुटीचा हा विषय खासदारांना भविष्यात होणाऱ्या मदतीसाठी किंवा सुनील तटकरे यांच्या मंत्रिपदापुरता मर्यादित नाही. तर देशातील पुढील राजकारणात होणाऱ्या संभाव्य बदलाच्या अनुषंगाने महत्वाचा आहे. येणाऱ्या काळात बिहार विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर नितीशकुमार यांच्याकडून राजकीय फेरमांडणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच त्यांच्या भूमिकेकडे भाजप आणि काँग्रेसचे व त्यातही इंडिया आघाडीचे लक्ष आहे.
नितीशकुमार यांनी जर काही वेगळा निर्णय घेतला तर केंद्रातील भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अडचण निर्माण होऊ शकते. अशावेळी महाराष्ट्रातून शरद पवार हे महत्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे देखील राष्ट्रवादीत पुन्हा एकदा फूट पाडून शरद पवार यांना शह देतानाच दुसरीकडे केंद्रातील सत्तेचे पारडे आणखी मजबूत ठेवण्यासाठी तर हा सर्व खटाटोप सुरू आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे.
जयंत पाटील ‘एकाकी’ –
प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील(Jayant Patil) सात वर्षे कार्यरत आहेत. राज्यात पक्ष बांधणीसाठी त्यांनी मेहनत घेतली आहे. मात्र योग्यवेळी संघटनेत फेरबदल करणे असो की जुन्या नव्यांचा मेळ घालणे यात ते अपयशी ठरले आहेत. त्यामुळेच कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांना बदलण्याची मागणी उचलून धरतानाच, वेळ देणारा आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणारा प्रदेशाध्यक्ष असावा, अशी मागणी केली आहे. पाटील यांना बदलण्याची आग्रही मागणी रोहित पवार यांनी सतत लावून धरली होती. त्यामुळे जयंत पाटील यांना पायउतार व्हावे लागण्याची मोठी शक्यता आहे. जर असे झाले तर पाटील यांची पुढची राजकीय दिशा काय, हा राष्ट्रवादीसाठी चिंतेचा विषय राहणार आहे.
खासदारांभोवती संशयाचे धुके –
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील सात खासदारांभोवती फुटीच्या संशयाचे वलय निर्माण झाले आहे. काही खासदारांचा अजित पवार यांच्याकडे असणारा ओढा जगजाहीर आहे. विधानसभेला पराभूत झालेले काही माजी आमदार हे देखील अजित पवार यांची विविध कारणास्तव भेट घेऊन संपर्कात राहत आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत फुटीचा दुसरा अंक पाहायला मिळण्याची शक्यता आहे.