
गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका!
भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर पुन्हा सडकून टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी शंभर शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला येतो, अशा शब्दांत टीका केली होती.
पडळकरांच्या या टीकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. अनेक ठिकाणी पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. पक्षनेतृत्वाने देखील पडळकरांना समज दिली होती.
हे वक्तव्य ताजं असताना गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर जहरी टीका केली आहे. त्यांनी शरद पवारांचा उल्लेख न करता, एखाद्या माणसामुळे तुतारी किती बदनाम होऊ शकते, ते आपण सर्वांनी बघितलं आहे, अशा शब्दांत टीकास्र सोडलं आहे. पडळकरांच्या टीकेनंतर पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. रविवारी सांगलीत धनगर समाजाच्या वतीने नागरी सन्मान सोहळ्याचं आयोजन केलं होतं. आमदार झाल्याबद्दल गोपीचंद पडळकर यांचा सत्कार या कार्यक्रमात झाल.
दरम्यान, या कार्यक्रमातून गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीकास्र सोडलं. या कार्यक्रमात पडळकर भाषण करण्यासाठी व्यासपीठावर उभे राहिल्यानंतर तुतारीचा निनाद सुरू झाला. यावर पडळकर यांनी शरद पवारांचा उल्लेख न करता मिश्कील टिप्पणी केली. तुतारी हे आपलं पारंपारिक वाद्य आहे. पण एका माणसामुळे ती किती बदनाम होऊ शकते, ते आपण बघितलं, असं पडळकरांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही टीकास्र सोडलं.
जयंत पाटील अडीच वर्षे राज्याचे जलसंपदा मंत्री होते, पण सांगली जिल्ह्यासाठी त्यांनी काय केलं, असा सवाल पडळकरांनी विचारला. तसेच जयंत पाटलांना आर आर पाटील यांचा मुलगा आमदार झालं याचं दुखणं अधिक आहे. आपला मुलगा आमदार झाला नाही, याचा टेन्शन आहे, अशी टीका पडळकरांनी केली.