
सोलापूर कोर्टाने निर्णय ठेवला राखून, लवकरच मोठी बातमी
बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि अवादा कंपनी खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका लागला असून जेलमध्ये आहे. हे प्रकरण ताजं असताना अशातच कराडच्या पोरगा सुशील कराडने घरात घुसून रिव्हॉल्वरचा धाक दाखवून दोन बल्कर ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोनं बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचं प्रकरण उघड झालं.
या प्रकरणी आता न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. मंगळवारी याबद्दल सोलापूर जिल्हा सत्र न्यायालय आपला फैसला देणार आहे.
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडविरोधात दाखल असलेल्या खासगी फिर्यादीवर आज जिल्हा-सत्र न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाला असून जिल्हा-सत्र न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. सुशील कराडवर गुन्हा दाखल होणार की नाही याबाबत मंगळवारी फैसला होणार आहे. त्यामुळे कोर्ट काय निर्णय देणार हे पाहण्याचं ठरणार आहे.
काय प्रकरण?
सुशील कराडने त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्वरचा धाक दाखवत दोन बल्कर ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुशील आणि वाल्मिक कराडसह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्याविरुद्ध ही खाजगी फिर्याद दाखल करून घेण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
मॅनेजरच्या पत्नीने याबाबत सोलापुरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन, सोलापूर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे तक्रार दिली मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे, पीडित महिलेने सोलापूर जिल्हा, सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली. त्यावर आरोपींनी त्यांचं म्हणणं दाखल केलं असून याबाबत सुनावणी सुरू आहे.