मांजरसुंब्याला 9 एकरावर आलिशान रिसॉर्ट, शेतकऱ्यांना द्यायचा त्रास
खंडणी हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांच्या पत्नी ज्योती जाधव यांच्या नावावर बीडच्या मांजरसुंबा परिसरात 9 एकर जमीन असून, परिसरात एकूण 50 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप होत आहे.
इतकेच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. खंडणी हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांच्या पत्नी ज्योती जाधव यांच्या नावाने बीडच्या मांजरसुंबा येथे 9 एकर जमीन असल्याचं समोर आलं आहे. या जमिनीवर रिसॉर्ट उभारण्याची तयारी सुरू होती. मात्र, केवळ 9 एकरच नव्हे, तर या परिसरात 50 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात आता मांजरसुंबा येथील शेतकऱ्यांनी आवाज उठवला आहे. शेतकरी मुकेश रसाळ यांनी आरोप केला आहे की, ज्योती जाधव यांनी त्यांच्या शेतातील मुरुम उपसा करून स्वतःच्या शेतात भरला.जमीन खरेदी केल्यापासूनच आम्हाला त्रास सुरू झाला. आमच्या शेतातील मुरुम उपसा केला. आम्ही प्रशासनाकडे तक्रार दिली होती, पण अजून कोणतीही कारवाई झाली नाही.
जुलै महिन्यापासूनच प्रशासनाकडे तक्रार
शेतकऱ्यांनी 2024 च्या जुलै महिन्यापासूनच प्रशासनाकडे तक्रार केली असली, तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.या प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रशासनाने या तक्रारींवर गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे.
खंडणी प्रकरणातला सर्वांत मोठा पुरावा
मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे एकत्रित सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्या दिवशी आवादा पवन ऊर्जा कंपनीकडे खंडणी मागितली त्याच दिवशी सर्व आरोपी एकत्र आल्याचे व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. 29 नोव्हेंबर 2024 चे सीसीटीव्ही फुटेज असल्याचे सांगितले जात आहे. या सीसीटीव्हीच्या रुपाने खंडणी प्रकरणातला सर्वांत मोठा पुरावा मिळाल्याचे बोलले जाते.
कंपनीच्या व्यवस्थापकाला दोन कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप
विष्णु चाटे याच्या केज शहरातील कार्यालयात वाल्मिक कराड आला होता. खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड याने विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून आवादा कंपनीच्या व्यवस्थापकाला दोन कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्यामुळे खंडणी प्रकरणात हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा समजला जात आहे
