
शिंदे कुणाला नकोसे? राऊतांनी नाव घेत केले मोठे दावे
ऊदय सामंत हे दावोसला एकनाथ शिंदे यांचे फोडण्यास गेले आहेत. सामंत यांना दिल्लीचा आशीर्वाद आहे, असा दावा शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांना नकोसे झाले आहेत.
उद्या नरेंद्र मोदी यांनाही नकोसे होतील, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
संजय राऊत म्हमाले, “पालकमंत्रिपदासाठी रस्त्यावर आंदोलन सुरू आहेत. हा महाराष्ट्राचा कारभार आहे. आयुष्यभर यांनी फोडाफोडी केली. स्वत:ही फुटले. हे अस्वस्थ आत्मे आहेत. हे शरद पवार यांना ‘भटकती आत्मा’ म्हणाले होते. हे स्वत: भटकती नाही ‘लटकती आत्मा’ आहेत. कुठेतरी समाधान मानलं पाहिजे. ‘ईव्हीएम’चा आदर करा. ‘ईव्हीएम’नं एवढं मोठे बहुमत दिलं आहे. ‘ईव्हीएम’च्या माध्यमातून आम्हीही जिंकलो आहे. कुठेतरी राज्याची प्रतिष्ठा सांभाळा.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 23 जानेवारीला जन्मदिन आहे. तुम्ही परत एकदा दावोसमध्ये बसून शिवसेनाप्रमुखांचा पक्ष फोडण्याची भाषा करत आहेत. लाज वाटत नाही तुम्हाला… आमची नावे घ्या… आता आम्ही सगळे फुटणार आहोत, असं सांगा… आम्ही मरण पत्करू पण शरण जाणार नाही, असे आमचे 20 आमदार आणि खासदार आहेत. बेईमान यांच्यासोबत शेण खायला गेले आहेत,” अशी टीका राऊत यांनी शिंदे गटावर केली आहे.
उदय सामंत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमधून तातडीनं माघारी पाठवायला हवे. ते तिकडे काय करत आहेत? उदय सामंत हे दावोसला एकनाथ शिंदे यांचे आमदार फोडण्यास गेले आहेत. आता भांडे फुटल्यामुळे सामंत सारवासारवी करत आहेत, असं म्हणत राऊत यांनी सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे.
उदय सामंत यांना दिल्लीचा आशीर्वाद आहे. एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांना नकोसे झाले आहेत. उद्या नरेंद्र मोदी यांनाही नकोसे होतील. भाजपचे अंतरंग मी ओळखले आहेत. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आणि प्रमोद महाजन होते, तेव्हा आमचे बरे चालले होते. पण, गेल्या दहा वर्षात प्रत्येक दिवस दिल्ली आणि महाराष्ट्रात कटकारस्थान रचण्यात येत होते,असेही राऊत यांनी सांगितलं.