लातूर कारागृहात स्पेशल ट्रीटमेंट मिळत असल्याचा अंजली दमानियांचा दावा
संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. दरम्यान अंजली दमानियांनी या प्रकरणात पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. संतोष देशमुखांचा मारेकरी विष्णू चाटेला पोलीस प्रशासन स्पेशल ट्रीटमेंट देत असल्याचा दावा, दमानिया यांनी केला आहे.
विष्णू चाटे सारख्या गुन्हेगाराला जेलचा चॉइस का देण्यात आला ? विष्णु चाटेने बीड ऐवजी लातूर कारागृहाची मागणी करण्यामागचं कारण काय ? असे सवाल दमानियांनी सोशल मीडियावर उपस्थित केले आहेत.
अंजली दमानियांनी एक्स (पूर्वीचे ट्वीटर) हँडलवर एक पोस्ट लिहिली आहे. अंजली दमानियांनी पोस्टमध्ये लिहिलंय की, “आणि धक्कादायक बाब विष्णू चाटे सारख्या गुन्हेगाराला जेलचा चॉइस ? विष्णु चाटेने बीड ऐवजी लातुर कारागृहाची मांगणी का केली आणि ती त्यांची मागणी पूर्ण करण्यात आली ?
1) 1st सुभेदार – नारायण मुंडे (जवळचे नातेवाईक)
2) मुरलीधर गित्ते (बंदुकवाल्या फडचा मेव्हणा)
3) श्रीकृष्ण चौरे ( मावसभाऊ व 5 पोकलेनचा मालक)
सगळे मर्जीतले ? हा आरोप समाजाविरुद्ध नक्कीच नाही ह्याची नोंद घ्यावी. असे जेल आरोपी / गुन्हेगार का मागतो यासाठी दिलेले कारण समजून घ्यावे. ही माहिती मिळाल्यावर मी नावांची चौकशी केली. ती ही आहेत असे मला सांगण्यात आले. नाती आहेत की नाही ते कन्फर्म करता येत नाही. स्पेशल ट्रीटमेंटची सुरुवात कारागृहाच्या आगमनापासुनच सुरुवात. ताबडतोब ही पूर्ण चौकशी मुंबईला हलवा आणि त्या गुन्हेगाराला पण मुंबईला आर्थर रोड जेलमध्ये ठेवा. आज मी ही मागणी ADG संजय सक्सेना यांच्याकडे भेटून केली. उद्या DG रश्मी शुक्ला यांची सकाळी भेट घेणार आहे.
लातूर जेलमध्ये चाटेच्या मर्जीतली लॉबी असल्याचं, दमानिया यांचं म्हणणं आहे. तसेच या पोस्टचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये म्हणून ही पोस्ट एखाद्या समाजाविरुद्ध नाही, हे दमानियांनी त्यांच्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकारकडून आणि पोलीस यंत्रणेकडून काय कारवाई केली जातेय, ते पाहावं लागेल
