
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाचे अंधेरीत तर शिंदे गटाच बीकेसीवर अभिवादन..
बाळासाहेब ठाकरे यांनी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करत आणि मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेना स्थापन केली. या पक्षाचे सरकार सत्तेत आणले. पुढे अनेक वादळे शिवसेनेने झेलली. 2019 नंतर शिवसेनेने भूमिका घेत महाविकास आघडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
तर एकनाथ शिंदे यांनी बंड करत वेगळी भूमिका घेतली. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. आता एक शिवसेना सत्ताधाऱ्यांसोबत तर दुसरी सेना ही विरोधी खेम्यात एकमेकांविरोधात दंड थोपटून आहेत. आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. या जयंतीनिमित्त मुंबईतच नाही तर राज्यभर त्यांना दोन्ही शिवसेनेकडून अभिवादन करण्यात येत आहे.
निष्ठा एक, मेळावे दोन
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईत दोन शिवसेनेचे मेळावे होत आहे. एक अंधेरीत तर दुसरा बीकेसी मध्ये मेळावा होत आहे. बीकेसीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिवसेनेचा मेळावा पार पडणार आहे. मोठं असं व्यासपीठ या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. असंख्य खुर्च्या देखील लावण्यात आलेल्या आहेत. मोठमोठे कट आउट देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत या कट आउट मध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट आऊट लावण्यात आलेले आहेत. संपूर्ण वातावरण हे भगवामय पाहायला मिळत आहे. बॉलीवूड सुप्रसिद्ध गायक सोनू निगम तसेच अवधूत गुप्ते यांच्या संगीताची मैफिल देखील रंगणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय मार्गदर्शन करणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे.
आज विजयोत्सव
23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस विजयोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक निर्णय घेतल्यानेच शिवसेनेला लोकसभा, विधानसभेत दणदणीत विजय मिळाल्याचा दावा माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केला. त्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व सहकारी, मंत्री, आमदार, खासदारांचा नागरी सत्कार करण्यात येत आहे.
बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी
आज सकाळीच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसैनिकांनी कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. तर शिवसेना नेते अनिल देसाई यांनी बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी शिंदे गटाला हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांची आठवण करून दिली.
ठाकरे गटाने भाजपाला डिवचले
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी ठाकरे गटाने भाजपला डिवचले. कलानगर जंक्शन मातोश्री आणि माहीम परिसरामध्ये ठाकरे गटाने भाजपला डिवचणारे बॅनर लावले. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाने भाजपवर निशाणा साधला.
भाजपचे हिंदुत्व आणि माझं हिंदुत्व वेगळं त्यांच्या दावणीला आम्ही बांधलेलं नाही. भाजपशी आम्ही युती केली पण दळभद्री निघाल लेकाचे. ताबडतोब घरातून हाकलून लावलं पाहिजे त्या कमळीला”असे डिवचनारे बॅनर ठिक ठिकाणी लावण्यात आले आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून देखील मातोश्री कलानगर जंक्शन वर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे.