मणिपूरमधील भाजप सरकारला दिलेला पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतलेल्या जेडीयूने मोठे पाऊल उचलत मणिपूर प्रदेशाध्यक्षांची हकालपट्टी केली आहे. पक्षाने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून, तो चुकीचा असल्याचे जाहीर केले आहे.
जेडीयूने भाजप सरकारला पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र, पक्षाच्या नेतृत्वाने यावर हस्तक्षेप करत मणिपूर प्रदेशाध्यक्षांना पदावरून दूर केले. पक्षाने याबाबत सविस्तर स्पष्टीकरण देत सांगितले की, भाजपसोबतचा आमचा संबंध अजूनही कायम आहे. हा निर्णय वैयक्तिक पातळीवर घेण्यात आला होता.
जेडीयूने पाठिंबा काढल्याने भाजप सरकारला तात्काळ कोणताही धोका नसला तरी, हा निर्णय भाजपसोबतच्या संबंधांवर दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो, अशी चर्चा सुरू झाली होती.भाजपकडे 32 जागांसह स्पष्ट बहुमत आहे. त्याशिवाय एनपीपीच्या 7 आणि एनपीएफच्या 5 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे जेडीयूच्या पाठिंबा काढण्याने सरकारला धोका निर्माण झाला नाही.
जेडीयू नेतृत्वाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवत प्रदेशाध्यक्षांची हकालपट्टी केली आहे. यामुळे नितीश कुमार ( Nitish Kumar) भाजपसोबत असलेल्या युतीला धक्का देण्याच्या कोणत्याही शक्यतेला पूर्णविराम मिळाला आहे.भाजपसोबतचे संबंध टिकवण्याची भूमिका पक्षाने पुन्हा स्पष्ट केली असून, यामुळे देशातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता कमी झाली आहे.


