
भाजपमधून माजी आमदारासह ZP नेत्याची हकालपट्टी
गोपीचंद पडळकर हे उपरे आहेत, त्यामुळे त्यांना उमेदवार न देता जत तालुक्यातील भूमिपुत्राला संधी द्यावी, अशी त्यांची मागणी होती. ती फेटाळून लावत भाजपने पडळकर यांना मैदानात उतरवले.
जत : लोकसभा निवडणुकीत अपक्षाला, तर विधानसभा निवडणुकीत बंडखोर उमेदवाराला पाठिंबा दिल्याच्या कारणावरून जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांची भाजपने ( BJP) पक्षातून हकालपट्टी केली.
जत विधानसभा मतदार संघात बंडखोरी करणारे माजी जि. प. सभापती तम्मनगौडा रविपाटील यांचीही हकालपट्टी करण्यात आली.
दरम्यान, आम्ही याआधीच पक्ष सोडला आहे. पक्षाच्या पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, मग ही कारवाई कशासाठी, असा सवाल श्री. जगताप आणि श्री. रविपाटील यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत विलासराव जगताप यांनी भाजप उमेदवार संजय पाटील यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली होती. अपक्ष विशाल पाटील यांना त्यांनी उघड पाठिंबा दिला होता.
तेंव्हापासून ते भाजपशी फारकत घेऊन होते, मात्र विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी पुन्हा पक्षातील प्रमुख इच्छुकांना सोबत घेऊन जतमध्ये नव्याने मांडणी सुरु केली होती. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे उपरे आहेत, त्यामुळे त्यांना उमेदवार न देता जत तालुक्यातील भूमिपुत्राला संधी द्यावी, अशी त्यांची मागणी होती. ती फेटाळून लावत भाजपने पडळकर यांना मैदानात उतरवले. त्यांच्या विरोधात जगताप समर्थक रविपाटील यांनी बंडखोरी केली. पडळकर विजयी झाले.
त्यानंतर जगताप आणि रविपाटील यांच्यावरील कारवाईची चर्चा सुरू होती. पक्षाचे कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी आज या दोन नेत्यांच्या हकालपट्टीचे पत्र जाहीर केले. या कारवाईनंतर जगताप पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पक्षाने त्यांचा राजीनामा न स्वीकारता हकालपट्टीचे धोरण राबवल्याने त्यांच्यासाठी हा भाजपात परतण्याचे दरवाजे बंद झाले आहेत. अर्थात, जत भाजपमधील पडळकर यांचा वाढलेला प्रभाव लक्षात घेता जगताप नवा मार्ग काय पत्करणार, याकडे लक्ष लागलेले होते. भाजपच्या कारवाईनंतर त्या चर्चेला पुन्हा धुमारे फुटले.
‘सहा महिन्यांपूर्वीच राजीनामा दिलाय’
माजी आमदार विलासराव जगताप यांनी ‘सहा महिन्यांपूर्वी भाजपच्या प्रदेश कार्यालयाकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठवून दिला होता. पक्षाला एवढ्या दिवसांनी जाग येते, ही गोष्ट हास्यास्पद आहे,’ अशी प्रतिक्रिया ‘सकाळ’शी बोलताना दिली.