
रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर आली.
वाल्मिक कराड याच्या पोटात दुखायला लागल्याने त्याला काल रात्री बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती नाजूक असल्याने त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केलाय.
आरोपींना बरोबर वाल्मीक कराड दिसला पण त्यावर पोलीस काही बोलत नाहीत. पोटदुखी सांगून वाल्मिक कराड सहानुभूती मिळवित आहे. पुढे तो खाजगी रुग्णालय किंवा सरकारी रुग्णालयात अॅडमिट होऊ शकतो, असा दावा रोहित पवार यांनी केलाय. रोहित पवार यांनी दावा केल्यानंतर चर्चांना उधाण आले आहे.
रोहित पवारांचा महायुतीला टोला
पालकमंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला. यावरून रोहित पवार यांनी महायुतीला टोला लगावलाय. त्यांनी म्हटलंय की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतात की, कोणाला काय काम द्यावे. कोणत्या मंत्र्यांनी काय काम करावे हे एकच माणूस ठरवतो, ते सध्या दावोसला आहेत. प्रत्येक जिल्ह्याला तीन पालकमंत्रिपद द्या. एक दादांना, एक भाजप आणि एक शिवसेनेला द्या, असे रोहित पवारांनी म्हटले. तसेच, पालकमंत्री पदासाठी आंदोलन होत आहेत, हे पहिल्यांदाच होत आहे. नाशिकमध्ये महाकुंभ होणार आहे. 10 हजार कोटींची काम होणार हे दिसत आहे. तर रायगडला पैसा जास्त आहे. काही ठिकाणी खाणी आहेत म्हणून पालकमंत्रिपद पाहिजे, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले.
मंत्र्यावर आरोप झाले तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे. यावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याबाबत रोहित पवारांनी भाष्य केलंय. त्यांनी म्हटलंय की, कुठल्याही मंत्र्यावर आरोप झाले तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अजित पवार नेते आहेत, त्यांनी मोठे मन दाखविले पाहिजे. तुमच्या कार्यकर्त्यांवर आरोप आहे. त्यामुळे तुम्ही राजीनामा द्या, चौकशी होऊ द्या, नैतिकता दाखवा, असे म्हटले पाहिजे, पण असे होत नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले.